परतीच्या पावसाचा धडाका, आवक वाढल्याने जायकवाडीचे १८ दरवाजे ४ फुटाने उघडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 19:35 IST2022-09-16T19:34:15+5:302022-09-16T19:35:31+5:30
गेल्या २४ तासात नाशिक व अहमदनगर जिल्ह्यास परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने तेथील धरण समूहातून होणारा विसर्ग आज सकाळपासून वाढविण्यात आला.

परतीच्या पावसाचा धडाका, आवक वाढल्याने जायकवाडीचे १८ दरवाजे ४ फुटाने उघडले
पैठण ( औरंगाबाद): नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरी व प्रवरा नदीस पूर आल्याने ६१३५४ क्युसेक्स क्षमतेने या नद्याचे पाणी जायकवाडी धरणाकडे येत आहे. यामुळे आज जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने वर उचलून ७५९५६ क्युसेक्स पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीस पुर आला आहे. विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या २४ तासात नाशिक व अहमदनगर जिल्ह्यास परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने तेथील धरण समूहातून होणारा विसर्ग आज सकाळपासून वाढविण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील दारणामधून १०५६२ क्युसेक्स, कडवा ७६३२ क्युसेक्स, गंगापूर ४८१५ क्युसेक्स व नांदूरमधमेश्वर वेअर मधून ३८३४५ क्युसेक्स विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला. याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा १३९८० क्युसेक्स, नीळवंडे १८९०४ क्युसेक्स, ओझर वेअर १६२८८ क्युसेक्स, मुळा १५००० क्युसेक्स व नेवासा केटी वेअर मधून २३००९ क्युसेक्स विसर्ग प्रवरा नदीत सुरू आहे. यामुळे दोन्ही नद्यांना पूर आला असून गतीने पाणी जायकवाडी धरणात दाखल होत आहे. दरम्यान, आज सायंकाळी जायकवाडी धरणात ४०८५२ क्युसेक्स पाणी दाखल होत होते. धरणाचा जलसाठा ९८.६८% झाला आहे.