भाडेकरूचा गाळा खाली करण्यास नकार, नातवंडांनी जागा मालक आजीचा मृ़तदेहच ठेवला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:47 IST2025-12-27T13:46:21+5:302025-12-27T13:47:19+5:30
मिल कॉर्नर परिसरात तासभर तणाव : मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी कुटुंबावर गुन्हा दाखल

भाडेकरूचा गाळा खाली करण्यास नकार, नातवंडांनी जागा मालक आजीचा मृ़तदेहच ठेवला समोर
छत्रपती संभाजीनगर : भाडेकरू गाळा खाली करत नसल्याने अनेक दिवसांपासून वाद सुरू असतानाच त्यादरम्यान मूळ मालक असलेल्या वृद्धेचा मृत्यू झाला. यामुळे नातवंडे आणि कुटुंबाने आजीचा मृतदेहच मेडिकलसमोर ठेवत गाळा खाली करण्यासाठी दबाव टाकला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे सिटी चौक पोलिसांनी मृतदेहाची विटंबना व अवहेलना केल्याप्रकरणी वृद्धेच्या कुटुंबातील दहा जणांवर गुरुवारी गुन्हा दाखल केला.
किरण राजू बोरसे, कपिल राजू बोरसे, श्याम राजू बोरसे, कृष्णा राजू बोरसे, स्वप्नील दीपक बोरसे, करण अरुण बोरसे, नितीन गुलाब लिंगायत, लखन वसंत लिंगायत, लखन अरुण बोरसे व सनी गणेश दळवी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. सिटी चौक पोलिसांच्या माहितीनुसार, शकुंतला बापूराव बोरसे यांच्या मालकीची मिल कॉर्नर परिसरात इमारत आहे. त्या इमारतीत एका इसमाला त्यांनी मेडिकलसाठी गाळा भाडेतत्त्वावर दिला होता. मात्र, त्याला वारंवार गाळा सोडण्यासाठी सांगून तो सोडत नव्हता. यातून त्यांच्यात अनेकदा वाद झाले. तरीही मेडिकल चालक गाळा सोडत नव्हता. त्याच दरम्यान मूळ मालक असलेल्या शकुंतला यांचे २५ डिसेंबरला निधन झाले. त्यानंतर कुटुंबाने थेट त्यांचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका भारत मेडिकलसमोर ठेवत संताप व्यक्त केला. त्याच्यासोबतच्या वादाचा धसका घेऊनच शकुंतला यांचे निधन झाल्याचा त्यांचा आरोप होता.
घटनेमुळे परिसरात मोठा जमाव जमला. काही राजकीय पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सिटी चौक ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस अंमलदार देवीदास वाडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी समजूत घालूनही कुटुंबाने तासभर मृतदेह हलवला नाही. त्यामुळे पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून मृतदेहाची विटंबना, अवहेलना केल्याचा ठपका ठेवत शासनातर्फे फिर्याद देऊन कुटुंबावर गुन्हा दाखल केला. सहायक फौजदार सुधाकर मिसाळ या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.