छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचे सर्वेक्षण; हेरिटेज कमिटीच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 17:30 IST2025-10-18T17:27:55+5:302025-10-18T17:30:02+5:30
या कामासाठी महापालिका प्रशासक पूर्णपणे सहकार्य करणार असून, यादीत काही नवीन ऐतिहासिक वास्तूंची नोंद घेतली जाईल.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचे सर्वेक्षण; हेरिटेज कमिटीच्या बैठकीत निर्णय
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक ऐतिहासिक स्थळांची वारसा यादीत नोंद करण्यात आलेली आहे. मागील अनेक वर्षांपासून ऐतिहासिक स्थळांची नवीन यादी तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या कार्यालयात झालेल्या हेरिटेज कमिटीच्या बैठकीत पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या कामासाठी महापालिका प्रशासक पूर्णपणे सहकार्य करणार असून, यादीत काही नवीन ऐतिहासिक वास्तूंची नोंद घेतली जाईल.
सर्वेक्षणासाठी ५ सदस्यांची एक स्वतंत्र उपसमिती नेमण्यात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदी इन्टॅकचे मुकुंद भोगले यांची निवड करण्यात आली. समितीमध्ये महापालिकेच्या नगर रचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे, नगररचनाकार कौस्तुभ भावे, शहर अभियंता फारुख खान, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे यांचा समावेश आहे. हे सर्वेक्षण ‘इन्टॅक’ ही संस्था करणार आहे. महानगरपालिकेने ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी ४० लाख रुपयांचा निधी राखीव ठेवला असून, त्यातून हे काम करण्यात येणार आहे. उपसमिती महानगरपालिका क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील इतर ऐतिहासिक आणि हेरिटेज वारसास्थळांचीही नोंद करणार आहे. सर्व वारसास्थळांचे छायाचित्रण तसेच ड्रोन फोटोग्राफी करण्यात येणार आहे.
नहर पाण्याचे बंब सुरक्षित करणार
शहरातील ४०० वर्षे जुन्या नहर-ए-अंबरीचे आजही पर्यटकांना आश्चर्य आहे. नहर-ए-अंबरीसह सर्वेक्षण करून त्याचा डिजिटल मॅप तयार केला जाणार आहे. सायफन पद्धतीने पाणी आणण्यासाठी अनेक ठिकाणी पाण्याचे बंब उभारले होते. आजही अनेक पाण्याचे बंब उभे आहेत. त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. नहरीचा जिथे उगम होतो त्या ठिकाणी एक माहिती केंद्र उभारावे, अशी सूचना करण्यात आली.
नागरिकांचा सहभाग
महापालिका या मोहिमेत नागरिकांनाही सहभागी करून घेणार आहे. यासाठी लवकरच जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले जाणार असून, नागरिकांनी आपल्या परिसरातील वारसा स्थळांविषयी माहिती द्यावी, असे आवाहन केले जाईल.