बसच्या धडकेत बैलगाडीचा चुराडा; उसतोड मजूर कुटुंबातील आई-मुलाचा मृत्यू, बाप-लेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 18:28 IST2022-11-29T18:27:08+5:302022-11-29T18:28:27+5:30
औरंगाबाद -नगर महामार्गावरील घटनेत उसतोड मजूर कुटुंबावर काळाचा घाला

बसच्या धडकेत बैलगाडीचा चुराडा; उसतोड मजूर कुटुंबातील आई-मुलाचा मृत्यू, बाप-लेक जखमी
लिंबेजळगाव (औरंगाबाद) : औरंगाबाद -नगर महामार्गावर उस घेऊन जाणाऱ्या बैलगाडीला भरधाव येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने जोराची धडक दिली. या अपघातात आई व मुलाचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ईसारवाडी फाट्याजवळ घडली.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील मानिकपुंज येथील ऊसतोड कामगार गोविंद विठ्ठल गिरे, बाळू गोविंद गिरे, सोन्याबाई गोविंद गिरे व अर्जुन गोविंद गिरे असे एकाच कुटुंबातील चार जण बैलगाडीतून औरंगाबाद-पुणे महामार्गाने जात होते. त्यांची बैलगाडी ईसारवाडी फाट्याजवळील एका ढाबापासून महामार्ग ओलांडत होती. त्याचवेळी नाशिककडून- औरंगाबादकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस (एम एच १४, बीटी - २५००) ने बैलगाडीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात बैलगाडी मधील सोन्याबाई गोविंद गिरे (वय ४० वर्षे) व अर्जुन गोविंद गिरी (वय १० वर्षे) हे आई व मुलगा असे दोघे ठार झाले. तर या महिलेचा पती गोविंद गिरे (वय ४५ वर्षे) व मुलगा बाळू गोविंद गिरे (वय १५ वर्षे) जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
विशेष म्हणजे, हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या धडकेत गाडी बैलगाडीचा चुराडा होऊन बैलगाडीच्या दोन बैलांपैकी एक बैल जागीच ठार झाला. तर दुसरा जखमी आहे. या अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद हानिफ, पोलीस अंमलदार विक्रम मडावी, जयेश जाधव, एस ए गवळी यांनी अपघातस्थळी धाव घेतली. दरम्यान सर्व जखमींना १०८ सरकारी रुग्णवाहिकेचे डॉ. अनंत पाटील व पायलट मुसा शेख यांनी उपचारार्थ गंगापूर व औरंगाबाद घाटीत दाखल केले. या अपघाताची नोंद वाळुज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.