विद्यार्थ्यांनो, पाहा इतका आहे प्राध्यापकांचा पगार; त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 07:20 PM2019-11-30T19:20:07+5:302019-11-30T19:23:44+5:30

व्यवस्थापन व प्राध्यापकांमधील वाद विकोपाला

Students, look at the professor's salary; Take advantage of their guidance | विद्यार्थ्यांनो, पाहा इतका आहे प्राध्यापकांचा पगार; त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या

विद्यार्थ्यांनो, पाहा इतका आहे प्राध्यापकांचा पगार; त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या

googlenewsNext
ठळक मुद्देबदनापूर महाविद्यालयात प्राचार्यांनी लावले होर्डिंग्ज विद्यार्थ्यांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे मत

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या पगारांचे आकडे असलेले होर्डिंग्ज प्रत्येक विभागाच्या बाहेर लावण्यात आले आहेत. या पगारपत्रकाच्या खाली ‘विद्यार्थ्यांनी सदरील शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा,’ असेही लिहिण्यात आले. त्यामुळे या होर्डिंग्जची विद्यार्थी, पालकांमध्येही खमंग चर्चा करण्यात येत आहे. प्राध्यापकांसोबतच्या टोकाच्या वादामुळे हा  मार्ग संस्थाचालकाने पत्कारल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक तासिका घेत नाहीत. एक लाखाच्या घरात प्राध्यापकांचे पगार गेलेले असताना तासिका घेण्यात येत नसल्याबद्दल अनेक ठिकाणी नाराजीचा सूरही दिसून येतो. त्यातच बदनापूर येथील महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य आणि प्राध्यापकांतील वाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सर्वश्रुत आहे. या महाविद्यालयातील चार प्राध्यापकांना निलंबित केलेले आहे. याविरोधात ‘बामुक्टो’सह इतर प्राध्यापक संघटनांनी आंदोलनेही केलेली आहेत. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी प्राचार्या आणि व्यवस्थापनाविरोधात विद्यापीठाचे कुलगुरू, उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक यांच्याकडे अनेक तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने संबंधित महाविद्यालयातील प्राध्यापकांचे पगार विद्यापीठामार्फत करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयानंतर संस्थाचालक आणि प्राध्यापकांमधील मतभेद विकोपाला गेले आहेत. यातूनच व्यवस्थापनाने महाविद्यालयातील प्रत्येक विभागाच्या बाहेर कार्यरत प्राध्यापक आणि त्यांचे पगाराचे आकडे मोठ्या व ठळक अक्षरात असलेले होर्डिंग्ज लावले आहेत. सदरील होर्डिंग्जमध्ये ७९ हजार ८० रुपये हा सर्वात कमी आणि १ लाख ६३ हजार ५६० रुपये हा सर्वाधिक पगाराचा आकडाही टाकण्यात आला आहे. प्राध्यापकांचे पगार पाच ते सहा आकड्यांत पोहोचले आहेत. हे आकडे पाहून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात येत आहे. 

एखाद्या संस्थेला कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा पगार असा सार्वजनिक ठिकाणी जाहीर करता येऊ शकतो. याविषयी काही नियम आहेत का? असा प्रश्नही यातून समोर आला आहे. काही प्राध्यापकांच्या मतानुसार पगारपत्रकांचे आकडे सार्वजनिक ठिकाणी जाहीर करून प्राध्यापकांच्या वैयक्तिकतेचा भंग करण्यात येत आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांमध्येही चुकीचा संदेश जात असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

प्राचार्यांचा पगार गुलदस्त्यात
बदनापूर येथील महाविद्यालयातील प्राध्यापकांचा पगार महाविद्यालयात होर्डिंग्ज लावून जाहीर केला आहे. मात्र, यातून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेहेर दत्ताभाऊ पाथ्रीकर यांना वगळण्यात आल्याची माहिती महाविद्यालयातील प्राध्यापकांनी दिली. प्राचार्या संस्थाचालकांच्या नातेवाईक असल्यामुळेच त्यांचा पगार गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याचा आरोपही नाव न छापण्याच्या अटीवर प्राध्यापकांनी केला आहे.

विद्यार्थ्यांना माहिती झाले पाहिजे
महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पगारावर शासन लाखो रुपये खर्च करीत आहे, तरीही प्राध्यापक वर्गात तासिका घेत नाहीत. तास न घेणाऱ्या प्राध्यापकांच्या पगारांचे आकडे विद्यार्थी, पालकांनाही समजले पाहिजेत, त्यांनी प्राध्यापकांना तास घेण्याचा आग्रही केला पाहिजे. यासाठी महाविद्यालयातील दर्शनी भागात पगाराचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. याविषयी शासनाला कळविण्यात येणार आहे.
- दत्ताभाऊ पाथ्रीकर, संस्थाचालक, बदनापूर महाविद्यालय

विद्यार्थी, पालकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रकार
भारतातील कोणत्याही संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचे सार्वजनिक ठिकाणी जाहीर प्रगटन केले जात नाही. मात्र, बदनापूर महाविद्यालयात ते करण्यात आले आहे. कोणाचेही पगार सार्वजनिक ठिकाणी लावण्यापूर्वी संबंधितांची परवानगी घेतली पाहिजे. कारण ही बाब गोपनीय आहे. बदनापूर महाविद्यालयातील प्रकार हा प्राध्यापकांच्या गोपनीयतेचा भंग आहे. यातून विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्राध्यापकांविषयी गैरसमज पसरविण्यात येत आहे. हे पूर्णत: चुकीचे आहे.
- डॉ. मारोती तेगमपुरे, जालना जिल्हाध्यक्ष, बामुक्टो संघटना

Web Title: Students, look at the professor's salary; Take advantage of their guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.