पाण्याच्या शोधात आलेल्या हरणांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; तीन हरणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:40 IST2025-05-14T17:40:06+5:302025-05-14T17:40:44+5:30
वळदगाव येथे मंगळवारी पहाटे घडलेली घडना

पाण्याच्या शोधात आलेल्या हरणांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; तीन हरणांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : मंगळवारी पहाटे वनपरिक्षेत्रात प्राणीगणना वनविभागाकडून सुरू असतानाच, वळदगाव येथे खाम नदीवर हरणांचा कळप पाणी पिण्यासाठी आला. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन हरणांचा मृत्यू, तर एक जखमी झाले.
गावातील सुनील मुंडे यांनी जखमी हरणे पाहून पोलिस पाटील प्रकाश म्हस्के, सरपंच अमर डागर, माजी सरपंच गणेश नवले यांना माहिती दिली. त्यांंनी वनविभागाला कळविले. खुलताबाद वन परिक्षेत्राचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वनविभागाच्या आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक निष्कर्षानुसार हरणांचा कळप रस्ता चुकून मानवी वस्तीमध्ये शिरला. त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग लवकर सापडला नाही. यावेळी गावातील भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. यात तीन मादी हरणांचा मृत्यू झाला. पाडस वाचले. वनविभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील उपचार केंद्रात उपचार सुरू आहेत. शवविच्छेदन जिल्हा पशुरुग्णालयात करण्यात आले आणि त्यानंतर अंत्यसंस्कार वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या तरतुदींनुसार दौलताबाद येथे करण्यात आले, असे वन परिक्षेत्र अधिकारी नितीन देशमुख यांनी सांगितले.
हरणांचे शवविच्छेदन
उपवनसंरक्षक सुवर्णा माने, तसेच सहायक वन संरक्षक आशा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल देशमुख, वनपाल सुधीर धवन, वनरक्षक मयूर चौधरी यांनी कार्यवाही केली.