वैजापूर तहसीलचे मैदान ‘चोरीला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:24 AM2019-01-21T00:24:37+5:302019-01-21T00:24:51+5:30

अतिक्रमणाचा विळखा : समस्यांनी नागरिकांचे हाल; अधिकाऱ्यांचे कायम दुर्लक्ष

   The 'stolen' grounds of Vaizapur Tehsil | वैजापूर तहसीलचे मैदान ‘चोरीला’

वैजापूर तहसीलचे मैदान ‘चोरीला’

googlenewsNext

मोबीन खान
वैजापूर : येथील तहसील कार्यालयाचे मैदान चोरीला गेले आहे. उपोषण करण्यासाठी असलेले मैदान अणि वाहन उभे करण्यासाठी असलेली जागा गायब झाल्या असून तेथे अतिक्रमण झाले आहे. परंतु, हे मैदान कोणी गायब केले, त्याचे मालक कोण, याचे उत्तर महसूल विभागाकडेही नाही. आश्चर्य म्हणजे या अतिक्रमणधारकांवर कोणताही कागदोपत्री कार्यवाहीचा पुरावा नाही.
वैजापूर शहरात अतिशय महत्त्वाचा आणि सतत गजबजलेला परिसर म्हणून तहसील कार्यालयाची ओळख आहे. मात्र, तहसीलच्या हद्दीत असलेल्या मोकळ्या जागेवर ही अतिक्रमणे झालेली आहेत. खोकी टाकून, काही जणांनी पत्राशेड मारून, काहींनी तहसीलच्या भिंती पाडलेल्या आहेत आणि लोखंडी आधार उभा करून शेकडो चौरस फूट जागेवर फुकटात ताबा घेतलेला आहे. तहसील आवारातील इतके मोठे मैदान अशाप्रकारे गायब होऊन तेथे अतिक्रमण झाले आहे.
याठिकाणी आता चहाचे हॉटेल, सेतू केंद्र, झेरॉक्स सेंटर अवतरले आहे. या जागेवर अतिक्रमण करणाºया जादुगाराचा शोध घेण्यासाठी महसूल यंत्रणा संमोहित झाल्याप्रमाणे शांत बसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अतिक्रमण, अनावश्यक मनमानी बदल आणि जाहिरात फलकांचा भडीमार यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, खुलेआम झालेल्या जागेतील अतिक्रमणास कुणाचे संरक्षण आहे, याविषयी चर्चा सुरू झालेली आहे.
तहसील परिसरातील मोकळ्या जागेत झालेली ही अतिक्रमणे अधिकाºयांना दिसत कशी नाहीत, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. ही अतिक्रमणे हटवून तहसील परिसरात केलेले बेकायदा अतिक्रमण काढले जाणार का, याकडे वैजापूरकरांचे लक्ष लागले आहे.
मोक्याच्या जागी वाहनतळाचा प्रश्न
शहरातील शासकीय कार्यालये, बँका व इतर मोक्याच्या ठिकाणी वाहतुकीची समस्या आहे. शहराचा विस्तार वाढत असताना वाहनतळाचा प्रश्न जटील बनला आहे. बेशिस्तपणाचा कळस सामान्य माणसाला चांगलाच त्रासदायक ठरतोय. तहसील आवारात तर तहसीलदारांच्या कॅबिनपर्यंत वाहने लावली जातात. शासकीय कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी दररोज शहरी व ग्रामीण भागातील असंख्य नागरिक येत असतात. वाहनतळाची व्यवस्था नसल्याने ही मंडळी भररस्त्यावर वाहने लावतात. त्यात दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. तहसील कार्यालयासमोर तहसीलदारांचे वाहन, मुख्याधिकारी व राजकीय पुढाºयांची वाहने उभी असतात. वाहन बाहेर काढताना चालकास कसरत करावी लागते. नगरपालिका व तहसील ही दोन्ही कार्यालये एकाच ठिकाणी असल्यामुळे दररोज हजारो नागरिक कामानिमित्त येत असतात.

Web Title:    The 'stolen' grounds of Vaizapur Tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.