बकरीला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीचा अपघात; सर्पमित्र शिक्षकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 19:09 IST2025-04-30T19:08:47+5:302025-04-30T19:09:01+5:30
अपघातात मृत शिक्षकाचा तीन वर्षांचा नातू जखमी झाला आहे.

बकरीला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीचा अपघात; सर्पमित्र शिक्षकाचा मृत्यू
करंजखेड ( छत्रपती संभाजीनगर) : समोर आलेल्या बकरीला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार सर्पमित्र असलेल्या शिक्षकाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा लहान नातू जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी करंजखेड-नागापूर रस्त्यावर घडली. सलीम अहेमद सिराज (वय ५५, रा. करंजखेड) असे मयताचे नाव आहे.
करंजखेड येथील झकेरिया उर्दू प्राथमिक शाळेचे सहशिक्षक तथा सर्पमित्र सलीम अहेमद सिराज हे नागापूर येथे घरासाठी कलर खरेदी करण्यासाठी सोमवारी दुपारी दुचाकीवर गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा ३ वर्षांचा नातूही होता. तेथून परतताना सायंकाळी ५ वाजता रस्त्यावर अचानक आलेल्या बकरीला वाचविताना त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला व ते जोरात खाली आदळले. यात सलीम हे गंभीर जखमी झाले. तर नातवाला किरकोळ मार लागला. ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ करंजखेड येथील खासगी रुग्णालयात व नंतर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुुरू असताना त्यांचा रात्री मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
घरी लग्नाची तयारी सुरु असताना शोककळा
सलीम अहेमद सिराज हे शिक्षकी पेशासोबतच सर्पमित्र म्हणून परिसरात प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक सापांना पकडून गौताळा अभयारण्यात सोडून जीवदान दिले. त्यांचा मोठा मुलगा भारतीय सैन्यदलात आहे. लहान मुलगा रफीक अहमद याचे ७ मे रोजी लग्न असल्याने घरी आनंदाचे वातावरण होते. मात्र सलीम यांच्या जाण्याने आनंदाचे वातावरण दु:खात बदलले.
फोटो.