प्रतिबंधित मांसाची तस्करी; छत्रपती संभाजीनगरात गोरक्षकासह पोलिसावर जमावाचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:02 IST2025-10-08T12:59:58+5:302025-10-08T13:02:00+5:30
चिकलठाण्यात दिवसभर कडेकोट बंदोबस्त; मांस तस्करांवर कठोर कारवाईसाठी हिंदू संघटना आक्रमक

प्रतिबंधित मांसाची तस्करी; छत्रपती संभाजीनगरात गोरक्षकासह पोलिसावर जमावाचा हल्ला
छत्रपती संभाजीनगर : प्रतिबंधित जनावरांच्या मांसाची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून धाव घेतलेल्या गोरक्षक व पोलिसावर महिला, तरुण व अल्पवयीन मुलांच्या २० ते २५ जणांच्या जमावाने शस्त्र, लाठ्या काठ्याने हल्ला चढवला. यात गणेश आप्पासाहेब शेळके (२४, रा. पळशी) हा गंभीर जखमी झाला. तर त्याच्यासोबतच्या पोलिस अंमलदाराला धक्काबुक्की करत गणवेश फाडण्यात आला. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या घटनेनंतर चिकलठाण्यात दिवसभर तणाव होता. सिटीचौक व केंब्रिज चौकात दोन कारवाई झाल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
केंब्रिज चौकात प्रतिबंधित मांसाची तस्करी होणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. एमआयडीसी सिडको पोलिसांनी त्यावरून केंब्रिज चौकात मांस वाहून नेणारी रिक्षा पकडली. त्याच दरम्यान दुसरी रिक्षा सुमारास चिकलठाण्यातील पुष्पक गार्डन परिसरात गेल्याचे त्यांना कळले. पोलिस अंमलदार अंकुश ढगे, गणेशने त्या दिशेने धाव घेतली. गाेरक्षक व पोलिस आल्याचे कळताच मांस तस्कर संतप्त झाले व त्यांनी जमाव जमवून दोघांवर हल्ला चढवला. चाकू, लोखंडी रॉड, लाठ्या काठ्याने वार करत गणेशला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ढगे यांना धक्काबुक्की केली. ढगे यांनी त्याही परिस्थितीत गणेशला जमावाच्या तावडीतून सोडवत दुचाकीवरून रुग्णालयात भरती केले. त्याच्या पाठ, डोक्यावर खोलवर जखमा झाल्या असून, गणेशची प्रकृती चिंताजनक होती.
कडेकोट बंदोबस्त, चार संशयित ताब्यात
पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे, सचिन इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले. रात्री उशिरापर्यंत चिकलठाण्यात कडेकोट बंदोबस्त तैनात होता. रात्री उशिरा संशयित इसा कुरेशी, फेरोज कुरेशी, उजेफ कुरेशी व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. आरोपींमध्ये ५ महिलांचा समावेश आहे.
तीन गुन्हे दाखल
पोलिसांनी गंभीर दखल घेत तीन गुन्हे दाखल केले. गणेशच्या जबाबावरून जमावावर हत्येचा प्रयत्न, मारहाण, दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंमलदार ढगे यांच्या तक्रारीवरून याच जमावावर सरकारी कामात हस्तक्षेपाचा, तर केंब्रिज चौकातील मांस पकडल्याचा तिसरा गुन्हा दाखल केला.
संघटना आक्रमक, आज निदर्शने
या हल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या. गणेशची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दिवसभर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. सायंकाळी हिंदू संघटनांची बैठक झाली. बैठकीत बुधवारी क्रांतीचौकात सकाळी १०:३० वाजता या घटनेविरोधात तीव्र निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला. शिवाय, मांस तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी संघटनांकडून पोलिसांना आठ दिवसांचा अल्टीमेटम देण्यावरही चर्चा झाली.
मनपा मुख्यालयाजवळ कारवाई
मनपा मुख्यालयाजवळ काहींनी कत्तलीसाठी जनावरे आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, सहायक निरीक्षक दिलीप चंदन यांनी सोमवारी रात्री ९ वाजता धाव घेत सात जनावरांची सुटका करत आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी इश्तियाक अहेमद कुरेशी बाबुमिया कुरेशी, शेख साबेर शेख हुसेन याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.