नक्षत्रवाडीत ६ जलशुद्धीकरण केंद्र; नवीन पाणीपुरवठा योजनेत ४० कोटी लिटर पाण्याचे शुद्धीकरण

By मुजीब देवणीकर | Published: April 3, 2024 01:09 PM2024-04-03T13:09:38+5:302024-04-03T13:11:49+5:30

नक्षत्रवाडी येथील डोंगराच्या पायथ्याशी सहा वॉटर फिल्टर बेड उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी दररोज ४० कोटी लिटर पाण्यावर प्रक्रिया भविष्यात होईल.

Six large water treatment plants in Nakshatrawadi; Purification of 40 crore liters of water in new water supply scheme | नक्षत्रवाडीत ६ जलशुद्धीकरण केंद्र; नवीन पाणीपुरवठा योजनेत ४० कोटी लिटर पाण्याचे शुद्धीकरण

नक्षत्रवाडीत ६ जलशुद्धीकरण केंद्र; नवीन पाणीपुरवठा योजनेत ४० कोटी लिटर पाण्याचे शुद्धीकरण

छत्रपती संभाजीनगर : २७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर ४० कोटी लिटर पाण्यावर दररोज शुद्धीकरण करता येईल. सध्या दररोज फक्त साडेतेरा कोटी लिटर पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया होत आहे.

२७४० कोटी रुपयांच्या योजनेत महापालिकेला ८२२ कोटी रुपयांचा वाटा टाकावा लागणार आहे. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, राज्य शासन मनपाला सॉफ्ट लोनच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या कामात निधीची अडचण भासणार नाही. पाणीपुरवठा योजनेसाठी नक्षत्रवाडी येथील डोंगराच्या पायथ्याशी सहा मोठे जलशुद्धीकरण केंद्र तयार केले जात आहे. या केंद्रात ८० फिल्टर बेड असणार आहेत. यापैकी ३० फिल्टर बेडचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. फिल्टर बेड्सच्या माध्यमातून रोज ३९२ एमएलडी (चाळीस कोटी लिटर) पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाणार आहे. 

शुद्धीकरणाची प्रक्रिया केलेले पाणी शहरवासीयांना सहा वेगवेगळ्या जलवाहिन्यांद्वारे दिले जाणार आहे. त्यामुळे रोज पाणीपुरवठा होईल, असा दावा केला जात आहे. सध्या फारोळ्यात रोज १३० ते १३५ एमएलडी पाण्यावर (साडेतेरा कोटी लिटर पाण्यावर) शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जात आहे.

चाळीस कोटी लिटर पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केल्यावर हे पाणी नक्षत्रवाडीच्या डोंगराच्या पायथ्याशी बांधलेल्या संपमध्ये (जमिनीखालील जलकुंभ) साठवले जाणार असून संपमधील पाणी पंपांच्या सहाय्याने डोंगरावरील एमबीआरमध्ये चढवले जाणार आहे. एमबीआरमधून गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवले जाणार आहे. संपमधून एमबीआरपर्यंत पाणी चढविण्यासाठी १२७० अश्वशक्तीचे पाच पंप आणि ९०० अश्वशक्तीचे पाच पंप वापरले जाणार आहेत.

Web Title: Six large water treatment plants in Nakshatrawadi; Purification of 40 crore liters of water in new water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.