"वाळू चोरून दाखवाच!"; तहसीलदारांनी चक्क ८०० ब्रास वाळूच्या ढिगाऱ्यापाशीच ठोकला तंबू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 19:36 IST2026-03-17T19:35:56+5:302026-03-17T19:36:18+5:30
वाळू तस्करांना रोखण्यासाठी तहसीलदारांचा मास्टर प्लॅन; जप्त ८०० ब्रास वाळूच्या संरक्षणासाठी 'बैठे पथक' तैनात

"वाळू चोरून दाखवाच!"; तहसीलदारांनी चक्क ८०० ब्रास वाळूच्या ढिगाऱ्यापाशीच ठोकला तंबू
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: तालुक्यातील भवन–चिंचखेडा परिसरात अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई केल्यानंतर, जप्त केलेली वाळू पुन्हा चोरी होऊ नये यासाठी महसूल विभागाने चक्क 'टेंट' ठोकून मुक्काम ठोकला आहे. तहसीलदार संजय देवराये यांनी ८०० ब्रास जप्त वाळूच्या ढिगाऱ्यापाशीच महसूल कर्मचारी आणि पोलिसांची 'चौकी' तयार केल्याने वाळू तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमका प्रकार?
भवन-चिंचखेडा वाळू पट्ट्यातून जेसीबी आणि हायवाच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार संजय देवराये यांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी दुपारी सिद्धेश्वर कारखान्याच्या विक्री झालेल्या जागेवर छापा टाकून ८०० ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला. मात्र, कारखान्याच्या सातबारावर बोझा चढवण्यावरून वाद निर्माण झाला आणि जागेच्या मालकीचा प्रश्न समोर आला.
तस्करांना रोखण्यासाठी 'नवीन शक्कल'
सहसा वाळू साठा जप्त केल्यावर तो तलाठी किंवा कोतवालांच्या ताब्यात दिला जातो, मात्र माफिया त्यांना न जुमानता जप्त केलेली वाळू पुन्हा चोरून नेतात. हा धोका टाळण्यासाठी तहसीलदार देवराये यांनी सोमवारी रात्री १० वाजता वाळू साठ्यावर टेंट ठोकला. आता तिथे दिवस-रात्र पोलीस आणि महसूल अधिकारी अभिषेक कोलते, मुक्तार शहा, काशिनाथ ताठे यांचे 'बैठे पथक' तैनात करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सिल्लोड तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.