सिद्धार्थ उद्यान, प्राणी संग्रहालय ६ वाजताच बंद; हिवाळ्यात अंधार लवकर होत असल्याने निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 19:49 IST2025-12-05T19:48:19+5:302025-12-05T19:49:56+5:30
सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालयात दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात.

सिद्धार्थ उद्यान, प्राणी संग्रहालय ६ वाजताच बंद; हिवाळ्यात अंधार लवकर होत असल्याने निर्णय
छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय सायंकाळी ठिक ६ वाजताच बंद करण्याचा निर्णय मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. हिवाळ्यात ६ वाजताच अंधार होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने नमूद केले.
सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालयात दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. हिवाळ्यात लहान मुलांच्या सहली सुद्धा बऱ्याच येत असतात. दिवसभर उद्यान, प्राणी संग्रहालय गजबजलेले असते. अलीकडेच प्राणी संग्रहालयात सिंहाची जोडी आणण्यात आली. त्यामुळेही पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाघ, बिबट्या, नीलगाय, सांबर, कोल्हा, माकड, अस्वल या प्रमुख प्राण्यांसह सर्पालय, मत्सालयालाही पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात.
शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे तरुण-तरुणीही येथे निवांत गप्पा मारण्यासाठी येतात. काही तरुणांना सुरक्षारक्षकांनी अश्लील कृत्य रोखण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून वाद निर्माण झाला. हा विषय प्रशासक यांच्यापर्यंत पोहोचला. त्यामुळे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी उद्यानाची वेळ एक तास कमी करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासकांना सादर केला. प्रशासकांनी तातडीने उद्यान बंद करण्याची वेळ एक तासाने कमी करण्याचा निर्णय घेतला. रात्री ७ ऐवजी सायंकाळी ६ वाजता तिकीट विक्री बंद करून उद्यान पूर्णपणे बंद केले जाणार आहे. उन्हाळ्यात रात्री ७ वाजता बंद करण्यात येईल.