धक्कादायक! धावत्या बसमधून महिलेने घेतली उडी, चाकाखाली येऊन जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:00 IST2025-10-30T16:56:24+5:302025-10-30T17:00:02+5:30
सोलापूर-धुळे मार्गावर गल्लेबोरगावजवळील घटना, पोलिस तपास सुरू

धक्कादायक! धावत्या बसमधून महिलेने घेतली उडी, चाकाखाली येऊन जागीच मृत्यू
गल्लेबोरगाव : खुलताबाद तालुक्यातील सोलापूर-धुळे महामार्गावर गल्लेबोरगावजवळ धावत्या बसमधून एका महिला प्रवासीने उडी घेतली. बसच्या मागील चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी (दि. २९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. कांताबाई योगेश मरमट (वय ४०, रा. देहाडे नगर, हर्सूल सावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
कन्नड आगाराची बस (क्रमांक एमएच- १४, बीटी- ३०३८) बुधवारी दुपारी तीन वाजता कन्नड येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. गल्लेबोरगाव येथून या बसमध्ये कांताबाई मरमट बसल्या व त्यांनी वेरूळचे तिकीट घेतले. प्रवासात महिलेने बस पळसवाडी परिसरातून जात असताना कोणाला काहीही न सांगता अचानक दरवाज्याकडे जाऊन धावत्या बसमधून उडी मारली. यात महिला बसच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. महिलेच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्यामुळे अद्याप ओळख पटू शकलेली नाही. बस वाहक व प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला काहीशी अस्वस्थ होती. तिचे केस विस्कटलेले, गळ्यात पोतही नाही. पांढरे ठिपके असलेली केसरी रंगाची साडी तिने परिधान केलेली होती.
अपघाताची माहिती मिळताच खुलताबाद पोलिस मनोहर पुंगळे, बीट जमादार राकेश आव्हाड, महामार्ग पोलिस सपोनि. इंगोले, रामनाथ भुसारे, राठोड, शांताराम सोनवणे, शरद दळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी चालक, वाहक, तसेच प्रवाशांचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
काही कळण्याआधीच उडी मारली
गल्लेबोरगाव येथून महिला बसमध्ये बसलेली होती. ती प्रवासादरम्यान काहीशी अस्वस्थ दिसत होती; पण कुणाशी काही बोलत नव्हती. तिने वेरूळ जाण्यासाठी तिकीट काढले आणि दरवाज्याकडे गेली. आम्हाला काही कळण्याआधीच तिने उडी मारली. चालकाने तत्काळ बस थांबवली; पण तोपर्यंत उशीर झाला होता.
- रंजना सोनवणे, बस वाहक
अचानक प्रवाशांचा गोंधळ
मी बस चालवत असताना अचानक मागे प्रवाशांचा गोंधळ ऐकू आला. ‘महिलेनं उडी मारली’, असे बसचे वाहक ओरडले. तेव्हा तत्काळ बस बाजूला थांबवली. खाली पाहिले तेव्हा एका महिला रस्त्यावर पडलेली दिसली. प्रवाशांसह तिच्या मदतीला धावलो; पण ती तेव्हाच बेशुद्ध अवस्थेत होती. आम्ही लगेच पोलिस व रुग्णवाहिकेला कळवले.
- बळीराम राठोड, बसचालक.