धक्कादायक! अदालत रोडवर भर दिवसा अज्ञात टवाळखोरांचा तरुणावर नाहक प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:55 IST2025-11-25T18:55:01+5:302025-11-25T18:55:35+5:30
रात्री उज्जैनला जाण्याचे होते नियोजन; तरुण गंभीर जखमी, घाटीत उपचार सुरू

धक्कादायक! अदालत रोडवर भर दिवसा अज्ञात टवाळखोरांचा तरुणावर नाहक प्राणघातक हल्ला
छत्रपती संभाजीनगर : उज्जैनला जाण्यासाठी शहरात आलेले दोन तरुण रस्त्याने नातेवाइकांकडे पायी जात होते. दोन नशेखोरांनी त्यांच्यावर नाहक हल्ला करून गंभीर जखमी केले. सोमवारी दुपारी २:३० वाजता अदालत रोडवरील पगारीया बजाज शोरूमसमोर ही घटना घडली. यात गौरव संजय मावस (२३, रा. मांगेगाव, ता. गंगापूर) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
जखमी गौरव व विजय साळुंके यांचे सोमवारी न्यायालय परिसरात एक काम होते. शिवाय, रात्री त्यांना शहरातून उज्जैनलादेखील निघायचे होते. सोमवारी दुपारी २:३० वाजता भगवान महावीर चौकात उतरून ते सतीश मोटर्सच्या दिशेेने पायी निघाले. पगारीया बजाज शोरूमच्या समोरून पायी जात असताना अचानक त्यांच्यावर हल्ला झाला. टवाळखोरांनी चाकू काढून गौरवच्या पोट व छातीत खोलवर खुपसला. यात गौरव क्षणार्धात रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळून बेशुद्ध पडला. त्याला रुग्णवाहिकेद्वारे घाटीत दाखल करण्यात आले. रात्री उशिरा याप्रकरणी दोन अज्ञातांवर क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नशेखोरांकडून हल्ल्याचा संशय
भर दिवसा झालेल्या हल्ल्याच्या घटनेने पोलिसही हैराण झाले. क्रांतीचौक, वेदांतनगर पोलिसांसह गुन्हे शाखेने धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, हा प्रकार नशेखोरांकडूनच झाल्याचा दाट संशय पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. एका हल्लेखोराने काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. त्याची उंची ५.६ फूट होती. तर दुसऱ्या कुरळे केसाच्या हल्लेखोराने टी-शर्ट परिधान केला होता.