धक्कादायक! मायलेकीने एकाच वेळी विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 16:02 IST2024-09-05T16:01:36+5:302024-09-05T16:02:19+5:30
याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

धक्कादायक! मायलेकीने एकाच वेळी विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन, कारण अस्पष्ट
गल्लेबोरगाव (छत्रपती संभाजीनगर) : खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील दुधारे वस्तीवर मायलेकीची विहिरीत उडी घेऊन, आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि ५) रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आली आहे. वंदना भरत दुधारे (३५) व मुलगी पल्लवी भरत दुधारे (१८) अशी मृत मायलेकीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
शेतकरी भरत भिकन दुधारे यांची गल्लेबोरगाव आखातवाडा रोडवरील दुधारे वस्तीवर शेती आहे. येथेच शेतवस्तीवरच दुधारे कुटुंबासह राहतात. शेतातील विहिरीमध्ये रात्री उशिरा वंदना आणि मुलगी पल्लवी यांनी उडी मारल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज सकाळी वंदना यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला. ग्रामस्थांनी शोध घेतला असता काही वेळाने मुलगी पल्लवीचा देखील मृतदेह विहिरीच्या तळाशी सापडला. दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी वेरूळ येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आली आहेत. दोघींच्या एकाच वेळी जीवन संपविण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, या घटनेची वार्ता समजताच गावकऱ्यांना धक्काबसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.