धक्कादायक ! पाणी टंचाईमुळे मोपेडवर पाण्याची कॅन नेणाऱ्या विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 20:28 IST2019-03-30T20:28:08+5:302019-03-30T20:28:46+5:30
मृत विद्यार्थी हा शहरातील पहिला पाणी बळी ठरला आहे.

धक्कादायक ! पाणी टंचाईमुळे मोपेडवर पाण्याची कॅन नेणाऱ्या विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडले
औरंगाबाद : पडेगाव परिसरातील माजी सैनिक कॉलनीत पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने मोपेडवर कॅन ठेवून पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला मागून सुसाट आलेल्या ट्रकने चिरडल्याची घटना छावणी रस्त्यावर शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. मृत विद्यार्थी हा शहरातील पहिला पाणी बळी ठरला आहे.
अक्षय महेंद्र चेट्टी (१६,रा. माजी सैनिक कॉलनी पडेगाव)असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, अक्षयने नुकतीच दहावी बोर्डची परीक्षा दिली आहे. त्यास दोन मोठ्या बहिणी असून एका बहिणीचे लग्न ठरले आहे. त्याचे वडिल पक्षघातामुळे बेडवर पडून असल्याने घरातील लहान-मोठी कामे अक्षयलाच करावी लागते. तो राहतो त्या परिसरात पाणी टंचाई असल्याने अक्षयसह त्याचे नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. नेहमीप्रमाणे अक्षय हा शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास प्लास्टीकची कॅन घेऊन मोपेडवर बसून पाणी आणण्यासाठी माजी सैनिक कॉलनीतून छावणी परिसरात जात होता.
छावणीतील लष्कराच्या कॅन्टीनसमोर वेगात आलेल्या मालवाहू ट्रकने उजव्या बाजूने मोपेडस्वार अक्षयला जोराची धडक दिल्याने तो मोपेडसह ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. या घटनेत अक्षय रक्ताच्या थारोळ्यात पडून घटनास्थळीच गतप्राण झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक घटनास्थळीच उभे करून तो छावणी पोलीस ठाण्यात दाखल झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच छावणीतील लष्कराचे जवान आणि छावणी ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृतदेह ट्रकखाली काढून अक्षयला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक ठोकळ तपास करीत आहे.