वीस हजारांत मिळते मृत्यूचे हत्यार; छत्रपती संभाजीनगरात गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:12 IST2026-01-21T16:11:57+5:302026-01-21T16:12:21+5:30
गोळीबाराच्या घटनेनंतरही शहरात पिस्तूल विक्रीसाठी जालन्यावरून तस्कर शहरात, एटीसी सेलकडून संबंधितांना अटक

वीस हजारांत मिळते मृत्यूचे हत्यार; छत्रपती संभाजीनगरात गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट
छत्रपती संभाजीनगर : शहरात गोळीबाराच्या घटनेच्या बारा तासांतच गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी आलेल्या भोकरदन तालुक्यातील बाबासाहेब रामभाऊ मिसाळ (३०) याला जिल्हा पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. अधिक चौकशीत त्याने काही दिवसांपूर्वी पिस्तूल विक्री केलेल्या रईस खान अजीम खान पठाण (४२, रा. हुसेन कॉलनी, पुंडलिकनगर) याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळून पिस्तूल जप्त केले.
२० जानेवारीला मुकुंदवाडी परिसरात शुभम जाट या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने दोन वेळा गोळीबार करत थेट पोलिसांना आव्हान दिले. एकीकडे या घटनेमुळे शहर पोलिस हादरले असताना दुसरीकडे शहरात राजरोस पिस्तूल विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. जिल्हा पोलिस दलाच्या दहशतवाद विरोधी कक्षाला जालन्यातून एक तरुण पिस्तूल विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या सूचनेवरून सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांनी सहकाऱ्यांसह हिरापूर शिवारात सापळा रचला. बाबासाहेब दुचाकीवर येताच त्याच्या मुसक्या आवळून चिकलठाणा ठाण्यात नेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुसे मिळून आली. अंमलदार विक्रम देशमुख, श्रीमंत भालेराव, संजय घुगे, राजेंद्र डकले, वाल्मीक निकम, गणेश कोरडे यांनी कारवाई केली.
पुंडलिकनगरचे गुन्हेगारी कनेक्शन पुन्हा समोर
बाबासाहेबची कसून चौकशी केल्यावर त्याने काही दिवसांपूर्वीच पुंडलिकनगरमध्ये राहणाऱ्या रईसला पिस्तूल विक्री केल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने त्याच्या घरी जात त्यालाही अटक केली. दोघांना पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांनी मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने २ दिवसांची पोलिस कोठडी दिल्याचे उपनिरीक्षक धुळे यांनी सांगितले.
अवघ्या २० ते २५ हजारांत खरेदी
बाबासाहेब गेल्या अनेक वर्षांपासून पिस्तुलाची तस्करी करतो. दोन वर्षांपूर्वी त्याला धुळ्यातील शिरपूर पोलिसांनी पिस्तूल विक्रीदरम्यान अटक केली होती. मध्यप्रदेशमधून तो २० ते २५ हजारांत स्टील धातूचे पिस्तूल खरेदी करतो. त्यानंतर मराठवाड्यात ३५ ते ४० हजारांत विक्री करत असल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, पोलिसांना हूल देण्यासाठी तो सातत्याने मोबाइल क्रमांक बदलत असतो.