छत्रपती संभाजीनगरातील 'ती' तोतया IAS महिला १० महिन्यांपासून पाकिस्तानी क्रमांकांच्या संपर्कात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:55 IST2025-11-27T13:53:46+5:302025-11-27T13:55:18+5:30
गृहमंत्र्यांची ओएसडी नावाने सेव्ह मोबाइल स्विच ऑफ; केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या नावे लेटरहेड, १९ कोटी व ६ लाखांचे धनादेश जप्त

छत्रपती संभाजीनगरातील 'ती' तोतया IAS महिला १० महिन्यांपासून पाकिस्तानी क्रमांकांच्या संपर्कात
छत्रपती संभाजीनगर : सहा महिन्यांपासून शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करणारी तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना भागवत ही पाकिस्तानच्या अफगाण ॲम्बॅसी, पेशावर कँटॉनमेंट बोर्ड, झरदारी सर वाईफ, अफगाणिस्तान ॲम्बॅसी, मुजीब भाई, झरदारी सर, मोहम्मद रजा व नक्वी अशा ११ क्रमांकांशी दहा महिन्यांपासून संपर्कात होती. पोलिस तपासात ही धक्कादायक बाब समजली. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी या ११ क्रमांकाचा तपास सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवारी कल्पनाला सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक योगेश गायकवाड यांनी बनावट कागदपत्रे आढळल्याने अटक केली. तपासात तिचे अफगाणिस्तानचा नागरिक व भारतात व्यावसायिक म्हणून वास्तव्यास असलेल्या मोहम्मद अशरफ खिल याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसोबत दहशतवादविरोधी पथकाने तपासात उडी घेतली. बुधवारी कल्पनाच्या पहिल्या पोलिस कोठडीची मुदत संपली. देशविघातक कृत्याचा संशय बळावल्याने पोलिस निरीक्षक येरमे, सहायक निरीक्षक योगेश गायकवाड, सहायक फौजदार सुभाष शेवाळे, अंमलदार दीपक देशमुख, संदीप जाधव, अविनाश पांढरे यांच्या पथकाने तिला कडेकोट बंदोबस्तात दुपारी न्यायालयात हजर केले.
वकिलाला म्हणते, ‘पाचपट फी देते’
अर्धा तास पोलिस, सरकारी वकिलांसह आरोपींच्या वकिलांनी १२ मुद्दे मांडले. न्यायालयाने तिला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कल्पनाला न्यायाधीशांनी बाहेर थांबण्यास सांगितले. तेव्हा कल्पनाने न्यायालयाच्या आवारात पोलिसांशी हुज्जत घातली. शिवाय वकिलाला ‘तुम्हाला मी पाचपट फी देते, मला पत्रकार परिषद घ्यायची आहे’, असेही बोलून दाखवले.
या मुद्द्यांमुळे तपास गंभीर वळणावर
- मोहम्मद अशरफ खिलचा भाऊ गालिफचा व्हिसा नाकारण्यात आला होता. त्यानंतरही त्याच्या कुटुंबाच्या पासपोर्ट व व्हिसाचे स्क्रीनशॉट कल्पनाच्या मोबाइलमध्ये कसे ?
- पाकिस्तानमध्ये हॉटेल चालवणाऱ्या अशरफच्या भावाशी कल्पना सातत्याने व्हॉटस्ॲपद्वारे संपर्कात. त्याच वेळी पेशावर कँटोन्मेंट बोर्ड व त्यातील अधिकाऱ्यांच्या नावे नंबर सेव्ह आढळले. ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
- अशरफचा भाऊ गालिबसोबतचे ‘चॅट’ अचानक ’डिलिट’ का व कोणी केले ?
-१ जानेवारी २०२५ पासून तिच्या खात्यात ३२ लाख रुपये आले.
- कल्पनाने देशात पाच विमान प्रवास केले. ते कोणाला भेटण्यासाठी, याचा पोलिस तपास करत आहेत.
१९ कोटींचे धनादेश
कल्पनाच्या घरझडतीत चेतन भानुशाली व निखिल भाकरे यांच्या नावे कॉसमॉस बँकेचे अनुक्रमे १९ कोटी व ६ लाखांचे दोन धनादेश आढळले. ते कोण आहेत, हे कल्पना सांगत नसल्याने पोलिस त्या दोघांच्या शोधात आहेत.
ओएसडी टू होम मिनिस्टर क्रमांक अचानक स्विच ऑफ
कल्पनाच्या मोबाइलमध्ये मॅट्रिक टेक्नॉलॉजी नावाने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयांना लिहिलेले लेटरहेड आढळले आहे. शिवाय, केंद्रीय गृहमंत्र्यांचे ओएसडी म्हणून अभिषेक चौधरी नावाने एक नंबरही सेव्ह आढळला. मात्र, कल्पनाला अटक होताच तो बंद झाला; तर प्रियकराने दिल्ली सोडून पलायन केले आहे. पोलिसांचे एक पथक लवकरच त्याच्या अटकेसाठी रवाना होणार आहे.
अशरफला मनोमन मानते पती
कल्पना व अशरफची एसएफएस मैदानावरील एका प्रदर्शनात भेट झाली, तेव्हा तिने स्वत: आयएएस अधिकारी असल्याचे त्याला सांगितले. त्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले. कल्पनाने अशरफचा नंबर ‘माय लव्हली हसबंड’ नावाने सेव्ह केल्याने ती त्याला मनोमन पती मानते. अशरफने तिला पेशावर कँटोन्मेंट बोर्ड, अधिकारी, तेथील अफगाणिस्तानचे नंबर दिले का, याचाही तपास यंत्रणा तपास करत आहेत.