'मी लहान लोकांबाबत भाष्य करणार नाही', शरद पवारांची अजित पवारांवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 16:57 IST2023-08-16T16:54:14+5:302023-08-16T16:57:48+5:30
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात झालेल्या भेटीबाबत अनेक चर्चा सुरू आहेत.

'मी लहान लोकांबाबत भाष्य करणार नाही', शरद पवारांची अजित पवारांवर खोचक टीका
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) सध्या मराठवाड्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, पुण्यात अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही भाष्य केले.
त्या बैठकीबाबत वेगळीच चर्चा
अलीकडेच अजित पवार यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. ही भेट अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती. राज्याच्या राजकारणात या भेटीबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. ती भेट ही कौटुंबिक असल्याचे शरद पवारांनी सांगितले आहे. पण, माध्यमांमध्ये याची वेगळीच चर्चा सुरू आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोरुन गेलो. माझ्या गाडीची काचही खालीच होती, मी बुकेही स्विकारला, हे माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिलं.
अजित पवारांवर टीका
पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून, माझा सल्ला घेण्याची पद्धत आमच्या कुटुंबात आहे. त्यामुळे भेटीबाबत गैरसमज करून घेण्याचे काहीही कारण नाही. या भेटीसाठी शरद पवार माध्यमांसमोरुन गेले, पण अजित पवार गुप्त पद्धतीने गेले. यावर शरद पवार म्हणाले, कोण कशा पद्धतीने आले होते, यावर मी सांगू शकत नाही. मी फक्त माझ्या बाबत बोलू शकतो. बाकी लहान लोकांबाबत मी भाष्य करत नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी अजितदादांवर निशाणा साधला.