सेक्सटॉर्शनचे जाळे! पाच पुरुषांमागे एक महिला पडतेय बळी, बदनामीपोटी तक्रार देण्यास टाळाटाळ
By सुमित डोळे | Updated: November 3, 2023 19:15 IST2023-11-03T19:15:20+5:302023-11-03T19:15:49+5:30
पोलिसांकडे नऊ महिन्यांत २१४ तक्रारी, बदनामीपोटी अनेकांची टाळाटाळ

सेक्सटॉर्शनचे जाळे! पाच पुरुषांमागे एक महिला पडतेय बळी, बदनामीपोटी तक्रार देण्यास टाळाटाळ
छत्रपती संभाजीनगर : आयटी कंपनीत नोकरीस असलेली २६ वर्षीय स्नेहा (नाव बदलले आहे) दुपारी कंपनीचे काम करत होती. दुपारी कामात व्यग्र असताना तिच्याकडून अनोळखी क्रमांकावरून आलेला व्हिडीओ कॉल रिसिव्ह झाला आणि पुढील आठ दिवस तिला मन:स्ताप सहन करावा लागला. सायबर गुन्हेगारांकडून बॅकग्राउंडला अश्लील क्लिप लावलेला स्क्रीनशॉट सेक्सटॉर्शनचा तो कॉल होता. आधी सोशल मीडिया अकाउंटवरील तिचे छायाचित्र मिळवण्यात आले होते. फ्रेंड़्स यादीतील सर्वांना व्हिडीओ कॉलचा स्क्रीनशॉट पाठवून पैशांची मागणी करून ब्लॅकमेल केले गेले. ५ पुरुषांमागे १ महिला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकत आहेत.
काय आहे सेक्सटॉर्शन ?
-तुमच्या सोशल मीडियावरील फ्रेंड लिस्टची माहिती गोळा केली जाते. तुमचे छायाचित्र काढून अश्लील प्रकारे मॉर्फ (एडिट) केले जाते.
-व्हॉट्स ॲप, टेलिग्रामवर व्हिडीओ कॉल प्राप्त होतो. समोर विवस्त्र स्त्री किंवा अश्लील क्लिप सुरू असते. तुमच्या चेहऱ्यासह स्क्रीन शॉट काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. पैसे न दिल्यास फ्रेंड लिस्टमधील सर्वांना ते शेअर करणे सुरू करतात.
काहींची चूक, काही निर्दोष
सायबर ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या माहितीनुसार, गेल्या ९ महिन्यांत सेक्सटॉर्शनच्या २१४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात अनेक प्रकरणात सुंदर तरुणींच्या छायाचित्रांना भाळून पुरुष फसतात. आता यात महिलांनाही लक्ष्य केले जात आहे.
बदनामीची भीती
अनेक जण बदनामीपोटी पोलिसांकडे जाणे टाळतात. कुटुंबालाही लवकर सांगत नाहीत. परिणामी, ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांची हिंमत वाढते. तक्रार उशिरा केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यतादेखील मावळते. त्यामुळे अशा प्रकरणात सायबर गुन्हेगारांना काहीच प्रतिसाद देऊ नये, असे तज्ज्ञ सांगतात.
ही काळजी घ्या
सेक्सटॉर्शनच्या तक्रारींवर काम करणारे सायबर ठाण्याचे वैभव वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
-सोशल मीडिया अकाऊंट प्रायव्हेट ठेवावे. तेथे कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत संपर्क ठेवू नये.
-व्हॉट्स ॲप, टेलिग्रामवर अनोळखी क्रमांकाचे व्हिडीओ कॉल रिसिव्ह करू नये.
-सर्व प्रकारचे पासवर्ड वेळोवेळी बदलावेत.
-अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, मोबाइलमध्ये अधिकृत ॲपच इंस्टॉल करावे.