शीतपेयाच्या व्यवसायात भागीदारी देण्याच्या आमिषाने वृद्धाची सात लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 22:33 IST2018-11-25T22:32:44+5:302018-11-25T22:33:12+5:30
शीतपेयाच्या व्यवसायात भागीदारीसह दरमहा ३३ हजार रुपये नफा देण्याचे आमिष दाखवून एका वृद्धाची सात लाखांची फसवणूक करण्यात आली. १२ जानेवारी २०१७ रोजी संजयनगर, बायजीपुरा येथे झालेल्या या फसवणूकप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

शीतपेयाच्या व्यवसायात भागीदारी देण्याच्या आमिषाने वृद्धाची सात लाखांची फसवणूक
औरंगाबाद : शीतपेयाच्या व्यवसायात भागीदारीसह दरमहा ३३ हजार रुपये नफा देण्याचे आमिष दाखवून एका वृद्धाची सात लाखांची फसवणूक करण्यात आली. १२ जानेवारी २०१७ रोजी संजयनगर, बायजीपुरा येथे झालेल्या या फसवणूकप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
मोहम्मद इरफान मोहम्मद जावेद (रा. खोकडपुरा) असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिन्सी पोलिसांनी सांगितले की, पैठणगेट येथील रहिवासी खाजा हसन खान महेबूब खान (६९) आणि आरोपी परस्परांच्या तोंडओळखीचे आहेत. गतवर्षी जानेवारी महिन्यात इरफान खाजा हसन यांना भेटला तेव्हा त्याने एक्झोटिक झिरू या नावाने शीतपेयाचा व्यवसाय असल्याचे सांगितले. या व्यवसायात सात लाख रुपये गुंतवणूक केल्यास तुम्हाला भागीदारी मिळेल. शिवाय जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत तुम्हाला दरमहा ३३ हजार रुपये नफा मिळेल, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून खाजा यांनी इरफान याच्यासोबत १२ जानेवारी २०१७ रोजी लेखी करार केला आणि त्यास चार लाख रुपये दिले. करार करताना इरफानने खाजा यांना तारण म्हणून सात लाखांचे दोन धनादेश दिलेले आहेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा इरफानने व्यवसायासाठी आणखी तीन लाख रुपये नेले. करारानुसार आठ महिन्यांच्या कालावधीत खाजा यांना दरमहा ३३ हजार रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र इरफान यांनी खाजा यांना एक रुपयाही परत केला नाही. एवढेच नव्हे तर करार संपल्यानंतर त्यांना त्याचे सात लाख रुपये दिले नाही. हे धनादेशही वटले नाही. शिवाय त्यांनी अधिक चौकशी केली असता इरफानचा शीतपेयाचा व्यवसाय नसल्याचे त्यांना समजले. यामुळे खाजा यांनी थेट जिन्सी पोलीस ठाण्यात इरफान विरोधात फसवणुकीची तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, तपास उपनिरीक्षक दत्ता शेळके करीत आहेत.