सुरक्षा आवळली; अजिंठा लेणीवर २१ सीसीटीव्हींची नजर

By Admin | Updated: August 19, 2014 02:16 IST2014-08-19T02:05:31+5:302014-08-19T02:16:26+5:30

अजिंठा : अजिंठा लेणीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाने २१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

Security cover; The sight of 21 cct at Ajanta cave | सुरक्षा आवळली; अजिंठा लेणीवर २१ सीसीटीव्हींची नजर

सुरक्षा आवळली; अजिंठा लेणीवर २१ सीसीटीव्हींची नजर




अजिंठा : अजिंठा लेणीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाने २१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. १ आॅगस्टपासून हे कॅमेरे कार्यान्वित झाले असून लेणीतील ‘व्ह्यू’ पॉइंट बुकिंग आॅफिस परिसरातील सर्व हालचालींवर करडी नजर ठेवली जाणार आहे.
मागील वर्षी बिहारमधील महाबोधी मंदिरात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यानंतर ११ जुलै २०१३ रोजी लोकमतने अजिंठा लेणीतील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याची दखल घेऊन सिल्लोड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राम मांडुरके यांनी लेणीत पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दररोज स्थानिक पोलीस, क्युआरटी, बॉम्बशोधक दल, सीआयडी यांची अजिंठा लेणीवर करडी नजर आहे. अचानक कधीही हा फोर्स येऊन लेणीच्या सुरक्षेचा आढावा घेतात. अजिंठा लेणी डोंगर माथ्यावर आहे. व्ह्यू पॉइंटवरून सहज अजिंठा लेणीत कुणीही प्रवेश करू शकतो. येथे कोणतीच सुरक्षा नाही हा मुद्दा ‘लोकमत’ने लावून धरला होता. त्याची दखल घेत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
एक कोटीचा खर्च
अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीसारखाच या कॅमेऱ्यांचाही दर्जा असून यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘ते’ तिघे संशयित सीसीटीव्हीत कैद
रविवारी अजिंठा लेणीत बॉम्बची अफवा पसरली होती. त्यानंतर ते पोलिसांचे मॉक ड्रील असल्याचे उघड झाले. या मॉकड्रीलमधील एक महिला व दोन पुरुष बॅग ठेवून बाहेर पडणार तोच स्थानिक सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे तिघे कैद झाले. त्यामुळे येथे मॉकड्रिलचा प्रयोग फसला अशी माहिती डी. एस. दानवे यांनी दिली.


लेणीतील बुकिंग आॅफिस, गुफा क्र. ९,१०,२६, महत्त्वाच्या लेण्या, परिसरातील डोंगरात आणि व्ह्यू पॉइंटवर हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याचे सर्व कंट्रोलिंग बुकिंग आॅफिसमधून होते.
४लवकरच लेणीत इंटरनेट सेवा घेऊन अजिंठा लेणीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाच्या आॅफिसमध्ये दिसतील अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती अजिंठा लेणीमधील पुरातत्व विभागाचे संरक्षक सहायक डी. एस. दानवे यांनी दिली.

Web Title: Security cover; The sight of 21 cct at Ajanta cave