रुग्णालयातून दागिने लंपास होण्याची छत्रपती संभाजीनगरातील दुसरी घटना, मृत रुग्णाच्या अंगावरील ४ तोळे सोने चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 20:00 IST2025-12-01T19:57:39+5:302025-12-01T20:00:02+5:30
अदालत रोडवरील खासगी रुग्णालयातील प्रकार, क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रुग्णालयातून दागिने लंपास होण्याची छत्रपती संभाजीनगरातील दुसरी घटना, मृत रुग्णाच्या अंगावरील ४ तोळे सोने चोरीला
छत्रपती संभाजीनगर : उपचारादरम्यान रुग्णाच्या अंगावरील दागिने लंपास होण्याची सलग दुसरी घटना अदालत रोडवरील एका खासगी रुग्णालयात समोर आली. ६३ वर्षीय बिजला मनोहर गायकवाड (६३) यांचे निधन झाल्यानंतर कुटुंब कागदोपत्री प्रक्रिया करण्यात व्यस्त असताना अतिदक्षता विभागातून त्यांच्या अंगावरील ४ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले. शुक्रवारी क्रांती चौक ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मूळ कन्नड तालुक्यातील बिजला यांची १३ नोव्हेंबर रोजी सकाळी अचानक प्रकृती बिघडली. त्यांची मुले संदीप व किरण यांनी त्यांना तातडीने अदालत रोडवरील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचा मुलगा संदीप आत होता, तेव्हा आईच्या अंगावर सर्व दागिने होते. दुपारी २ वाजता त्यांच्या आईचे निधन झाले. त्या वेदनेत मुले आईला पाहायला आत गेले. तेव्हादेखील दागिने तसेच होते. त्यानंतर क्रांती चौक पोलिस पंचनाम्यासाठी दाखल झाले. रुग्णालय प्रशासन चेहरा दिसेल असे संपूर्ण शरीर कपड्याने गुंडाळण्यात आले. त्यानंतर कुटुंबाने कागदोपत्री प्रक्रिया पार पाडली.
प्रक्रिया पूर्ण करून आईचा मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना मुलांना दागिने काढून घेण्याचे लक्षात आले. मात्र, अचानक आईच्या अंगावरील २ तोळ्यांची सोनसाखळी, २ तोळ्यांचे कानातील दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले. मावशी, पत्नीनेदेखील त्याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगितले.
रुग्णालयाचे दागिने देण्याचे आश्वासन, पण...
कुटुंबाने याबाबत रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांकडे तक्रार केली. डॉ. दिनेश पांडव, शैलेश खरे यांनीदेखील दागिने पाहिल्याचे कबूल केले. त्यानंतर आयसीयूत तपासणीत मिळून आलेले एक पेंडल परत केले. रुग्णालयाचे सीईओ डॉ. प्रशांत पाटील यांनी सात दिवसांत सर्व दागिने परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, कुटुंबाने वारंवार संपर्क करूनही ते मिळाले नाहीत. ही चोरी आयसीयूत कार्यरत हाऊस किपिंगचे कर्मचारी, नर्सिंग स्टाफने केल्याचा संशय कुटुंबाने तक्रारीत केला. अंमलदार संतोष मुदिराज अधिक तपास करीत आहेत.
आठवड्यात दुसरा प्रकार
३० ऑक्टोबर रोजीदेखील चिकलठाणा विमानतळ रस्त्यावरील एका बड्या रुग्णालयात बीडच्या व्यावसायिक सुनीता जवकर यांचे पती अतिदक्षता विभागात दाखल असताना त्यांच्या हातातील १ तोळ्याची अंगठी चोरीला गेली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात २६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.