निखारे बरसत असतानाही स्वाभिमानासाठी उभे; छ.संभाजीनगरमधील 'उन्हातल्या माणसांच्या' कथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 18:14 IST2026-04-28T18:12:02+5:302026-04-28T18:14:44+5:30
उन्हाच्या झळांतील संघर्ष; कर्तव्य आणि पोटाची खळगी भरण्यासाठी निसर्गाशी झगडा

निखारे बरसत असतानाही स्वाभिमानासाठी उभे; छ.संभाजीनगरमधील 'उन्हातल्या माणसांच्या' कथा
- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : शहरावर सध्या जणू निखारे बरसत आहेत. रणरणते ऊन, भट्टीसारखे तापलेले रस्ते आणि अंगाची लाहीलाही करणारी सूर्याची प्रखर किरणे...गेल्या काही दिवसांपासून शहराचा पारा ४१ ते अगदी ४३.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. या अंगावर येणाऱ्या उष्णतेच्या लाटेत आपण घराबाहेर पडायलाही घाबरतो. पण, याच भयंकर उन्हात काही माणसं अशी आहेत, जी उन्हाच्या किरणांना अलंकार मानून आपला जीवन संघर्ष लीलया पेलत आहेत. ही आपल्यातलीच सामान्य माणसे आहेत. जी असामान्य परिस्थितीतही रस्त्यावर उभी राहून आपले कर्तव्य आणि पोटाची खळगी भरण्यासाठी झगडत आहेत. या उच्चांकी तापमानात ही प्रातिनिधिक ‘उन्हातली माणसं’ खऱ्या अर्थाने ‘हिरो’ वाटतात.
पोटाची आग...
दुपारचे दीड वाजलेले. जालना रोड उन्हाने धगधगत होता. भंगार गोळा करणारे सादिक शेख आपली ओझ्याने भरलेली हातगाडी ओढत निघाले होते. शहराच्या विविध भागांतून गोळा केलेले भंगार त्यांनी गाडीवर लादले होते. उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर साधा रुमालही नव्हता. उन्हाचा त्रास होत नाही का? असे विचारल्यावर ते म्हणाले, ‘पोटासाठी सगळं करावं लागतं’. दिवसाकाठी मिळणाऱ्या २०० ते ३०० रुपयांसाठी हा माणूस गाडी लोटत उन्हाच्या झळांमध्ये दिसेनासा झाला.
कर्तव्याची जाणीव
आकाशवाणी सिग्नलवर वाहनांचा धूर आणि उन्हाचा चटका अशा दुहेरी संकटात ट्रॅफिक पोलिस सुभाष सयवर आपली ड्युटी बजावत होते. सतत उभं राहिल्याने आणि उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाहीलाही होते. ते सांगतात, रात्री घरी गेल्यावर तळपायांची आग होते. मळमळणे, भूक न लागणे हे तर आता रोजचेच झाले आहे. पण ही नोकरी आमचे कर्तव्य आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीत पार पाडावेच लागेल.
२५ वर्षांचा संघर्ष
मोंढा नाका परिसरात हमालीचे काम करणारे शेख ताहेर. अंगावर घामाच्या धारा वाहत असतानाही कित्येक किलोंच्या लोखंडी सळया आणि लाकडी ओंडके ते पाठीवरून वाहत होते. या काबाड कष्टाचे त्यांना दिवसाला २०० ते ३०० रुपये मिळतात. उन्हात काम करताना त्रास होत नाही का?, यावर ते सांगतात, त्रास झाला तर पोट कसं भरणार? गेली २५ वर्षे हेच काम करतोय, आता तर या उन्हाचीही सवय झाली आहे.
स्वाभिमानाचे चटके
वय वर्षे ६५. अंबिकानगरमध्ये एकट्याच राहणाऱ्या यशोदाबाई चव्हाण गेली ३० वर्षे बकऱ्या चारण्याचे काम करतात. सकाळी ११ वा. ऊन तापायला लागल्यावर त्या घराबाहेर पडतात आणि भर उन्हात दुपारी ४ वाजेपर्यंत बकऱ्यांमागे फिरत असतात. मुले आहेत, पण ती सांभाळत नाहीत, याचे दुःख त्यांच्या डोळ्यांत दिसते. उन्हात फिरताना हातपाय जळतात, पण स्वाभिमान त्यांना गप्प बसू देत नाही. त्या म्हणतात, फुकट काहीच मिळत नाही, काम तर करावंच लागतं.