औरंगाबाद : तुकडाबंदी आदेश मागे घेऊन एनए ४५, ४७ बी मालमत्तांची नोंदणीकृत खरेदी खत सुरू करा, या मागणीसाठी विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन केल्यानंतर सातारा परिसरातील रहिवाशांनी पुण्यात नोंदणी महानिबंधकांची भेट घेऊन गाऱ्हाणी मांडली.
राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्क विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात तुकडाबंदी कायद्यानुसार एनए ४५, एनए ४७ बीचे प्लॉट, भूखंडाचे नोंदणीकृत खरेदी खत बंद केले आहेत. तुकडाबंदी कायदा हा ग्रामीण भागातील जमिनीसाठी व ग्रीन झोनसाठी लागू असून महापालिका, नगर परिषद व वसाहत क्षेत्रासाठी लागू होत नाही. परंतु नोंदणी विभागाने बेकायदेशीरपणे एनए ४५, एनए ४७ बीचे प्लॉट, भूखंडाचे नोंदणीकृत खरेदी खत बंद केले. तुकडाबंदीच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केली जात आहे.
नोंदणीकृत खरेदी खत बंद केल्याने लाखो लोकांना नाहक त्रास होत आहे. खरेदी-विक्रीचा व्यवहार बंद झाल्याने अर्थिक कोंडी होऊन अनेकांवर उपासमारीची वेळ आली. कोविडनंतर जगण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. त्यासाठी खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करा, अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर काकडे, शक्ती गायकवाड, अनिल तौर, नितीन झरे पाटील, विष्णू चव्हाण आदींनी केली आहे.
कॅप्शन... पुणे येथील नोंदणी महानिबंधकांना निवेदन सादर करताना सातारा परिसरातील नागरिकांचे शिष्टमंडळ.