वाळूच्या हायवाचा हप्ता २० हजार रुपये महिना ! वाहतूक शाखेचा अंमलदार लाच घेताना अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:16 IST2025-01-08T17:16:31+5:302025-01-08T17:16:52+5:30

यापूर्वी देखील वाळू वाहतूक करणाऱ्यांसोबत पोलिसांचे संबंध उघड झाले आहेत.

Sand highway installment is Rs 20,000 per month! Traffic branch official arrested while taking bribe | वाळूच्या हायवाचा हप्ता २० हजार रुपये महिना ! वाहतूक शाखेचा अंमलदार लाच घेताना अटकेत

वाळूच्या हायवाचा हप्ता २० हजार रुपये महिना ! वाहतूक शाखेचा अंमलदार लाच घेताना अटकेत

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांच्या ग्रामीण हद्दीतून वाळूची वाहतूक करण्यासाठी एका हायवासाठी २० हजार रुपये महिना हप्ता लागेल, असा सज्जड दम भरून लाच म्हणून पहिला हप्ता स्वीकारताना पोलिस अंमलदार धीरज धर्मराज जाधव (५०, रा. रविनगर, हडको) याला एसीबीने रंगेहाथ अटक केली. सोमवारी रात्री ११.३० वाजता गाडेगाव फाट्याजवळ यासाठी सापळा रचण्यात आला होता.

धीरज ग्रामीण वाहतूक विभागात अंमलदार आहे. यापूर्वी देखील वाळू वाहतूक करणाऱ्यांसोबत पोलिसांचे संबंध उघड झाले आहेत. तक्रारदार व्यावसायिक अनेक महिन्यांपासून वाळू व्यवसायात सक्रिय आहेत. मात्र, ग्रामीण हद्दीतून हायवाची वाहतूक करण्यासाठी दर महिन्याला एका हायवासाठी २० हजार रुपये लागतील, अशी धमकीवजा अट जाधवने त्याला घातली. व्यावसायिकाने याची थेट एसीबीचे अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. आटाेळे यांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी तक्रारीची खातरजमा केली. त्यात जाधव लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.

हेडलँपच्या प्रकाशात रचला सापळा
तक्रारीची खातरजमा होताच सोमवारी सापळा रचण्यात आला. जाधवला संपर्क केल्यावर सोमवारी रात्री ११.३० वाजता वाळूज एमआयडीसी रस्त्यावरील गाडेगाव फाट्याजवळ त्याने जस्ट पॅक इंडस्ट्रियल कंपनीसमोर तक्रारदाराला बोलावले. निरीक्षक चव्हाण, अंमलदार राजेंद्र सिनकर व रवींद्र काळे यांचे पथक अंधारात लपून बसले होते. अंधार असल्याने तक्रारदाराला कारचे हेडलँप सुरू ठेवण्यास सांगितले. जाधवने त्याची चारचाकी दूर उभी करून साध्या वेशात तक्रारदाराच्या जवळ गेला. त्याच्याकडून २० हजार रुपये रोख स्वीकारताच ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने रुमाल खांद्यावर ठेवला आणि इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या पथकाने धाव घेत जाधवच्या मुसक्या आवळल्या. त्याला ताब्यात घेत बीडकीन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधाची खमंग चर्चा
या कारवाईमुळे वाळू तस्करी व पोलिसांच्या रेट कार्डविषयी पुन्हा एकदा खमंग चर्चा सुरू झाली. जाधव एकटाच लाचेत अडकल्याने एकटा अंमलदार रेटकार्ड ठरवेल का, असाही प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

Web Title: Sand highway installment is Rs 20,000 per month! Traffic branch official arrested while taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.