Samaruddhi Accident: देवदर्शनाला जाताना सख्ख्या बहिणींसह दोन सुना, मुलगा-नातीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 01:29 PM2023-03-13T13:29:18+5:302023-03-13T13:29:39+5:30

नळाचे पाणी भरण्यासाठी दोन्ही कुटुंबप्रमुख थांबले होते घरी

Samaruddhi Accident: Death of two daughters-in-law, son-grandson along with sibling sisters while going to Devdarshan to Shegav | Samaruddhi Accident: देवदर्शनाला जाताना सख्ख्या बहिणींसह दोन सुना, मुलगा-नातीचा मृत्यू

Samaruddhi Accident: देवदर्शनाला जाताना सख्ख्या बहिणींसह दोन सुना, मुलगा-नातीचा मृत्यू

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शेगावला देवदर्शनासाठी निघालेल्या सख्ख्या बहिणी हौसाबाई बर्वे व प्रमिला बोरुडे या दोघींचा मृत्यू समृद्धी महामार्गावर मेहकरनजीक झालेल्या भीषण अपघातात झाला. या अपघातात हौसाबाई यांची सून श्रद्धा व नात जान्हवी, तर प्रमिला यांचा मुलगा किरण आणि सून भाग्यश्री यांचाही मृत्यू झाला आहे.

जखमी सात जणांवर शहरातील सिटिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल करताच शेकडो आप्तस्वकीयांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. बर्वे कुटुंब हडकोतील एन ११ मध्ये राहते तर बोरुडे कुटुंब एन ९ हडकोमध्ये राहते. दोन्ही कुटुंबांचा लॉण्ड्रीचा व्यवसाय आहे. रवींद्र हे बर्वे कुटुंबाचे तर त्याचे काका (मावसा) राजेंद्र हे बोरुडे कुटुंबाचे प्रमख आहेत. या दोन्ही कुटुंबांनी शेगाव येथील गजानन महाराज यांच्या दर्शनाला जाण्यासाठी दोन गाड्या केल्या होत्या. मात्र, महापालिकेच्या नळाला शनिवारी पाणी येणार होते, ते न आल्यामुळे रवींद्र व राजेंद्र हे कुटुंबप्रमुख पाणी भरण्यासाठी पाठीमागे थांबले. त्यांनी एका कारमध्ये रविवारी पहाटे सहा वाजता दोन्ही कुटुंबांतील १२ जण आणि भाचीला पुढे पाठवून दिले. समृद्धी महामार्गावर मेहकर- सिंदखेडराजादरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसाजवळ सकाळी ८ वाजता कारने चार पलट्या मारल्या. 

यामध्ये १३ जण सर्व बाजूंना फेकले गेले. त्यातील रवींद्र यांची भाची वैष्णवी गायकवाड ही गंभीर जखमी झाली होती. ती शुद्धीवर आल्यानंतर तिने उपस्थित पोलिसांना तिच्या आईचा मोबाइल नंबर सांगितला. त्यावर फोन करून पोलिसांनी अपघाताची माहिती दिली. त्यानंतर शहरातून अनेकजण मेहकरच्या दिशेने रवाना झाले. ताेपर्यंत मेहकर ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर सात जणांना छत्रपती संभाजीनगरला पुढील उपचारासाठी हलविले. या जखमींमध्ये कुटुंबप्रमुख रवींद्र यांची पत्नी नम्रता, मुले रुद्र, यश आणि सौम्य यांच्यासह भाऊ सुरेश, पुतण्या जतीन आणि भाची वैष्णवी असे सातजण होते. जखमीतील रुद्रची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

चार वर्षांचा मुलगा आईला पोरका
या अपघातात श्रद्धा बर्वे यांच्यासह त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यांचा पती सुरेश व चार वर्षांचा मुलगा जतीन गंभीर जखमी आहेत. आईच्या मृत्यूमुळे चार वर्षांचा जतीन पोरका झाला आहे.

किरण-भाग्यश्रीचे वर्षभरापूर्वी लग्न
अपघातातील मृत किरण बोरुडे व भाग्यश्री बोरुडे या दोघांचे लग्न वर्षभरापूर्वीच झाले होते. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. या दोघांना मूल नव्हते. या दोघांसह किरणची आई प्रमिला यांचाही अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे बोरुडे कुटुंबात आता कुटुंबप्रमुख राजेंद्र बोरुडे व हवाईदलात असलेला मुलगा तुषार हे दोघेजणच राहिल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. तुषार हा महिनाभरापूर्वीच सुटीवरून विशाखापट्टणमला ड्युटीवर गेला होता. तो घटनेची माहिती समजताच शहराच्या दिशेने निघाला आहे.

आई, मावशी गेल्याचे समजताच फोडला हंबरडा
अपघातातील जखमींना उस्मानपुरा येथील सिटीकेअर हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर जखमी वैष्णवीची आई दवाखान्यात पोहोचली. त्यांना इतर जखमींवर जालना येथे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, काही वेळाने आईसह मावशी, दोन भावजया, मावसभाऊ आणि भाची मृत झाल्याचे समजताच त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जमलेल्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याचे दिसून आले.

अप्तस्वकीयांची हॉस्पिटलमध्ये गर्दी
उस्मानपुऱ्यातील हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू असल्यामुळे बर्वे, बोरुडे कुटुंबाच्या नातेवाईक, मित्र, गल्लीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. माजी महापौर बापू घडामोडे, माजी नगरसेवक राजगौरव वानखेडे, स्वाती नागरे, राजेंद्र इंगळे, कचरू घोडके यांच्यासह परीट (धोबी) समाज संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र सोनवणे, रामदास शिंदे, रामनाथ बोर्डे, अशोक दामले, कैलास निकम, शिवाजी लिंगायत, उज्ज्वल शिंदे, गणेश मुळे, मनोज शिरसाट यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Samaruddhi Accident: Death of two daughters-in-law, son-grandson along with sibling sisters while going to Devdarshan to Shegav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.