छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी योजनेत २ हजार कोटी रुपये खर्च; तरी कामे अपूर्णच
By मुजीब देवणीकर | Updated: November 26, 2025 16:45 IST2025-11-26T16:42:42+5:302025-11-26T16:45:02+5:30
२५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम बाकी; डिसेंबरअखेरची डेडलाइनही हुकणार, पहिल्या टप्प्यातील कामे प्रलंबित

छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी योजनेत २ हजार कोटी रुपये खर्च; तरी कामे अपूर्णच
छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत आतापर्यंत १९९० कोटी २८ लाख रुपये खर्च करण्यात आले. जवळपास ७० टक्के निधी खर्च झाल्यानंतरही योजनेचा पहिला टप्पाही पूर्ण झालेला नाही. नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारीपासून शहरात वाढीव २०० एमएलडी पाणी येईल, असा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात आला होता.
नियोजित वेळेत योजनेचा पहिला टप्पा पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. कारण २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम टाकळी फाटा येथे अपूर्ण आहे. जायकवाडी मोटारी, विद्युत कनेक्शन, जलशुद्धीकरण केंद्रातील काही कामे बाकी आहेत.
शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याचे ठरले तेव्हा योजनेची किंमत १६८० कोटी रुपये होती. योजनेचे काम सुरू झाल्यावर त्यास आणखी निधी वाढवून देण्याचे ठरले. २७४० कोटी रुपयांपर्यंत योजना गेली. हैदराबाद येथील जीव्हीपीआर आणि यंत्रसामग्रीसाठी महावीर या दोन एजन्सींची निवड करण्यात आली. पाच वर्षात योजनेचे काम ज्या पद्धतीने होणे अपेक्षित होते, तसे झालेले नाही. अत्यंत कासवगतीने काम सुरू आहे. खंडपीठासह शासनानेही वारंवार योजनेची गती वाढवण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वीच योजनेचा पहिला टप्पा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा, नवीन वर्षात शहराला वाढीव पाणी देण्याच्या सूचना केल्या. ३१ डिसेंबरसाठी आता फक्त ३४ दिवस शिल्लक आहेत. एका महिन्यात प्रलंबित कामे होणे अशक्य आहे.
कोणती महत्त्वाची कामे प्रलंबित?
२५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी ३८ किमी टाकली. त्यातील १३० मीटर काम टाकळी फाटा येथे शिल्लक आहे. ते जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. याशिवाय जॅकवेलच्या ठिकाणी एक पाण्याची मोटार बसविली. दुसरी बसविणे बाकी आहे. तेथे विद्युत जोडणीसाठी लागणारे महावितरणचे स्वतंत्र उपकेंद्र, वायरिंग इ. अनेक कामे प्रलंबित आहेत. नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील कामे, नक्षत्रवाडी येथील डोंगरावर उभारलेले पाणी वितरण केंद्र (एमबीआर) पूर्णपणे तयार नाही. जलवाहिन्यांची चाचणी बाकी आहे. शहरात ९ जलकुंभ बांधून तयार आहेत. जलकुंभातून नागरिकांना देण्यात येणाऱ्या पाण्यासाठी जोडण्या बाकी आहेत.
८२२ कोटींचे कर्ज घेतले
मनपाने योजनेत आपला वाटा टाकण्यासाठी ८२२ कोटींचे कर्ज घेतले. या कर्जातील पहिला हप्ता ८१ कोटी ८९ लाख रुपये मंगळवारी मिळाला. महापालिकेने लगेच हा निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग केला. निधीची गरज जशी लागेल, त्या पद्धतीने मनपा कर्जातील रक्कम देणार आहे.
आतापर्यंत योजनेसाठी दिलेला निधी
केंद्र शासन - ६८१ कोटी ४३ लाख
राज्य शासन - १२२६ कोटी ९६ लाख
मनपाचा वाटा- ८१ कोटी ८९ लाख