मोंढा नाका ते एपीआयपर्यंत पाडापाडी; एकही मोठी मालमत्ता रस्त्यात बाधित नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:29 IST2025-07-12T13:28:25+5:302025-07-12T13:29:33+5:30
४५ मीटर रुंदीकरणानुसार मनपाच्या नगररचना विभागाने दोन्ही बाजूंनी प्रत्येकी २२.५ मीटरवर मार्किंग केली.

मोंढा नाका ते एपीआयपर्यंत पाडापाडी; एकही मोठी मालमत्ता रस्त्यात बाधित नाही
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने शुक्रवारी सकाळी ११ वाजता मोंढा नाका येथून रस्ता रुंदीकरण मोहिमेला सुरुवात केली. दिवसभरात १८० लहान-मोठी बांधकामे पाडण्यात आली. या कारवाईत एकही मालमत्ता बाधित होत नसल्याचे निदर्शनास आले. बहुतांश इमारतींच्या पायऱ्या, वॉल कम्पाउंड बाधित होत होते. कुठे एक फूट, तर कुठे दोन फुटांवर मनपाला कारवाई करावी लागली.
शुक्रवारी सकाळी मोंढा नाका येथून पुढे कारवाईला सुरुवात झाली. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या लहान-मोठ्या व्यावसायिक मालमत्तांच्या पायऱ्या, शेड, संरक्षण भिंती बाधित होत होत्या. ४५ मीटर रुंदीकरणानुसार मनपाच्या नगररचना विभागाने दोन्ही बाजूंनी प्रत्येकी २२.५ मीटरवर मार्किंग केली. सिंधी कॉलनीकडे काही मालमत्ताधारक अंशत: बाधित झाले. काॅलनीत प्रवेश करण्यासाठी बांधलेली कमानही बाधित होती. ही कमान स्वत:हून काढून घेण्यासाठी ८ दिवसांचा वेळ अतिक्रमण हटाव प्रमुख संतोष वाहुळे यांनी दिला. आकाशवाणी चौकात आईस्क्रीमच्या दुकानाच्या पायऱ्या, एसएफएसच्या बाजूने काही बोर्ड काढत पथक सेव्हन हिल येथे पोहोचले. येथे एका मोठ्या शोरूमच्या बाजूच्या इमारतीच्या पायऱ्या बाधित झाल्या. बऱ्याच वादानंतर पायऱ्या तोडण्यात आल्या. पुढे एका बाजूने २२.५ मीटरप्रमाणे मोजणी करून पथक रामगिरी हॉटेल मार्गे वसंतराव नाईक चौकात पोहोचले. तेथून पुढे रस्त्यावर लहान-मोठ्या हातगाड्या, अतिक्रमणे काढण्यात आली. शनिवारी आणि रविवारी कारवाईला विश्रांती देण्यात आली.
शिवशक्ती कॉलनीत ५ दुकाने सील
शिवशक्ती कॉलनीतील ‘आडवळणी’ जागेत पाच दुकाने कोणाची, हा प्रश्न निर्माण झाला. दुकानांची पाहणी करून सील करण्याचे आदेश मनपा अधिकाऱ्यांनी दिले.
८ मालमत्ताधारकांना नोटिसा
शुक्रवारच्या कारवाईत मनपाकडून एकूण ८ मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आली. उर्वरित १९ मालमत्ताधारकांना सोमवारी नोटीस देण्यात येणार आहे, असे मनपातर्फे कळविण्यात आले.