रेल्वेमार्ग दुहेरीकरण, छत्रपती संभाजीनगरातील २९२८ मालमत्तांची नावे; बाधित किती? मोजणी कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:10 IST2025-12-01T17:05:22+5:302025-12-01T17:10:02+5:30
भूसंपादनासाठी प्रसिद्धीस दिलेल्या अधिसूचनांमध्ये कोणते गट क्रमांक, किती भूभाग आणि कोणत्या घरांचे संपादन होणार आहे, याची स्पष्ट माहिती दिलेली नसल्याने नागरिक धास्तावले आहेत.

रेल्वेमार्ग दुहेरीकरण, छत्रपती संभाजीनगरातील २९२८ मालमत्तांची नावे; बाधित किती? मोजणी कधी?
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते परभणी १७७ कि.मी. अंतरात रेल्वेमार्ग दुहेरीकरण प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू होत आहे. किती जमीन लागणार याची मोजणी झाल्यानंतरच किती मालमत्ता बाधित होणार, हे समजेल, असे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी स्पष्ट केले.
भूसंपादनासाठी प्रसिद्धीस दिलेल्या अधिसूचनांमध्ये कोणते गट क्रमांक, किती भूभाग आणि कोणत्या घरांचे संपादन होणार आहे, याची स्पष्ट माहिती दिलेली नसल्याने नागरिक धास्तावले आहेत. मनमाड ते परभणी या दक्षिण मध्य रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला सुरुवात झाली आहे. आता छत्रपती संभाजीनगर ते परभणी या १७७ कि.मी.चे दुहेरीकरण होत आहे. संभाजीनगर तालुक्यातील शेकटा गावाच्या हद्दीपर्यंत जमीन संपादनाची अधिसूचना जाहीर झाली आहे. दरम्यान ‘लोकमत’ने २८ नोव्हेंबरच्या अंकात भूसंपादन अधिसूचनेबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे नागरिकांना नेमके काय होणार, याचा अंदाज आला आहे.
२०१३ च्या कायद्यानुसार मोबदला
शहरातील विद्यमान रेल्वेमार्गालगत असलेल्या मालमत्ताधारकांच्या काही अडचणी आहेत. अपार्टमेंट बिल्डरच्या नावावर असले तरी नागरिक राहत आहेत. गुंठेवारी मालमत्ता आहेत. मोजणीच्या वेळी मालमत्ता कुणाच्या नावावर आहे आणि ताबा कुणाचा आहे, याबाबत आक्षेप आल्यानंतर सुनावणी घेऊन निवाडा होईल. मोजणीपर्यंत काहीही स्पष्ट होणार नाही. मूळ मालमत्ताधारकांना नोटीस गेल्यावर रेल्वे, बांधकाम विभाग, महसूल, टीएलआर विभागाचे अधिकाऱ्यांसमक्ष मोजणी होईल. शहरी भागात एकास दाेन याप्रमाणे, तर ग्रामीण भागात एकास चारपटप्रमाणे भूसंपादनाचा मावेजा देण्याची तरतूद भूसंपादन कायदा २०१३ मध्ये आहे.
-- एकनाथ बंगाळे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन
शहरातील १ हजार ५८ मालमत्ता
ग्रामीण भागातील सुमारे १८७०, शहरातील १ हजार ५८ मिळून २९२८ मालमत्ता बाधित होतील, असे अधिसूचनेत नमूद आहे. मुळात एवढ्या मालमत्ता बाधित होणार नाहीत. काही मालमत्ता रेल्वेच्या मध्यभागापासून हजार फुटांहून अधिक अंतरावर असतानाही त्यांचे संपादन अपेक्षित आहे का, तसेच नमूद गट क्रमांक पूर्णपणे बाधित होणार की अंशतः याबाबत स्पष्टता नाही.
मुख्यमंत्र्यांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथील विमानतळावर आले असताना, त्यांना आ. संजय केणेकर व शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी रेल्वेमार्ग दुहेरीकरणात स्टेशन ते करमाड या भागातील २९२८ नागरिकांच्या मालमत्ता बाधित होत असल्याच्या अधिसूचनेबाबत माहिती दिली. रेल्वेचा विकास व्हावा, परंतु सामान्य नागरिकांचे घर जाऊ नये, यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना त्रास होणार नाही, असे आश्वासित केल्याचे शितोळे यांनी सांगितले.