पैठण 'MIDC'त अंबानींच्या सुनेची एन्ट्री; ३ महिन्यांत दुसऱ्यांदा राधिका मर्चंट यांच्याकडून पाहणी, विस्ताराला बळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:58 IST2026-02-26T16:58:32+5:302026-02-26T16:58:53+5:30
कडक पोलीस बंदोबस्त अन् गाड्यांचा ताफा! राधिका मर्चंट यांचे पैठण एमआयडीसीत आगमन; एमआयडीसीच्या विस्ताराला मिळणार बळ

पैठण 'MIDC'त अंबानींच्या सुनेची एन्ट्री; ३ महिन्यांत दुसऱ्यांदा राधिका मर्चंट यांच्याकडून पाहणी, विस्ताराला बळ
- समीर पठाण
जायकवाडी (पैठण): पैठण एमआयडीसीमधील औषधी क्षेत्रातील अग्रगण्य 'इनकोर हेल्थ केअर' कंपनीला गुरुवारी (दि. २६) कंपनीच्या संचालिका राधिका मर्चंट-अंबानी यांनी भेट दिली. अवघ्या तीन महिन्यांच्या अंतराने राधिका मर्चंट यांनी दुसऱ्यांदा पैठणला भेट दिल्याने स्थानिक औद्योगिक वर्तुळात मोठ्या विस्ताराच्या चर्चा रंगल्या आहेत.
हेलिकॉप्टरने आगमन अन् कडक सुरक्षा
गुरुवारी सकाळी १०:३० वाजता राधिका मर्चंट आणि त्यांचे वडील विरेन मर्चंट यांचे हेलिकॉप्टरने संत एकनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील हेलिपॅडवर आगमन झाले. राधिका मर्चंट येणार असल्याची माहिती मिळताच हेलिपॅड परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केल्याने वाहनांचा ताफा थेट एमआयडीसीतील कंपनीच्या प्रकल्पस्थळी रवाना झाला.
काय होता भेटीचा उद्देश?
यापूर्वी १ व २ डिसेंबर २०२५ रोजी राधिका मर्चंट पैठण दौऱ्यावर आल्या होत्या. या एकदिवसीय दौऱ्यात त्यांनी कंपनीच्या विविध प्रकल्पांची प्रगती, उत्पादनाची गुणवत्ता आणि भविष्यातील विस्तार योजनांचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीदरम्यान एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
औद्योगिक विकासाला चालना
अंबानी आणि मर्चंट कुटुंबाच्या या भेटीमुळे पैठण औद्योगिक वसाहतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या भेटीमुळे कंपनीच्या विस्ताराला गती मिळेल, ज्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.