व्हेंटिलेटर लावले म्हणजे रुग्ण गेला, असे नाही, ८० टक्के रुग्ण ठणठणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 17:25 IST2025-10-06T17:20:40+5:302025-10-06T17:25:02+5:30
घाटीत ‘मास्टरक्लास इन मेकॅनिकल व्हेंटिलेटशन'मध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन

व्हेंटिलेटर लावले म्हणजे रुग्ण गेला, असे नाही, ८० टक्के रुग्ण ठणठणीत
छत्रपती संभाजीनगर : ‘ व्हेटिंलेटर लावले म्हणजे रुग्ण गेला’ असा सर्वसामान्यांचा समज आहे. परंतु हे चूक आहे. गंभीर- अतिगंभीर रुग्णांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटर अत्यावश्यक ठरते. व्हेंटिलेटरवरील ६० ते ८० टक्के रुग्णांचा जीव वाचतो. त्यासाठी व्हेंटिलेटरच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव व व्यावहारिक प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरते, असा सूर रविवारी घाटीत पार पडलेल्या ‘मास्टरक्लास इन मेकॅनिकल व्हेंटिलेटशन' या कार्यशाळेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी ‘आयएमए’चे अध्यक्ष डाॅ. अनुपम टाकळकर, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनच्या (आयएससीसीएम) शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. योगेश लक्कस, सचिव डॉ. राहुल चौधरी, कोषाध्यक्ष डॉ. प्रशांत वळसे, घाटीतील मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, डाॅ. गायत्री तडवळकर, डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ. प्रसाद देशपांडे, डाॅ. सुचिता देशपांडे, डाॅ. श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांची उपस्थिती होती.
परिषदेत ‘आयएससीसीएम’चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष डॉ. अक्षय छल्लाणी, मुंबई येथील डॉ. भरत जगियासी, डॉ. रवींद्र घावट, पुणे येथील खातीब खालिद यांनी मार्गदर्शन केले.
२०० डाॅक्टरांचा सहभाग
या मास्टरक्लासमध्ये २०० डॉक्टर्स, कन्सल्टंट्स व पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रि-वर्कशॉप लेक्चर्स, हँड्स-ऑन ट्रेनिंग तसेच पेपर व पोस्टर प्रेझेंटेशन, आदींतून 'आयसीयू'मध्ये व्हेंटिलेटरच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव व प्रशिक्षण देण्यात आले.
व्हेंटिलेटरवरील रुग्ण दीड महिन्याने पायी घरी
डाॅ. योगेश लक्कस म्हणाले, व्हेंटिलेटरवर दीड महिने असलेले रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून पायी घरी गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतर फुप्फुस निकामी झाल्यानंतर व्हेंटिलेटर रुग्णाचा जीव वाचविणारी प्रणाली ठरते. या व्हेंटिलेटरमध्ये वेगवेगळे ‘मोड’ असतात. रुग्णाच्या प्रकृतीनुसार त्याचा वापर करावा लागतो. आयसीयूतज्ज्ञ म्हणजे रुग्णालयाचे ‘बॅकबोन’ असतात.