सिल्लोडमध्ये दुय्यम निबंधकांच्या नावे ५८ हजारांची लाच घेताना प्रॉपर्टी एजंट ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:32 IST2025-08-30T17:31:21+5:302025-08-30T17:32:12+5:30
प्रॉपर्टी एजंट अटकेत, दुय्यम निबंधकाची चौकशी होणार का?

सिल्लोडमध्ये दुय्यम निबंधकांच्या नावे ५८ हजारांची लाच घेताना प्रॉपर्टी एजंट ताब्यात
सिल्लोड : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात प्लॉटची नोंदणी करून देण्यासाठी प्लॉटधारकाकडे शासकीय चलानाच्या दहा हजारांसह ‘साहेबां’च्या नावे ७० हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली. यातील ५८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रॉपर्टी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मार्केट यार्ड येथे सापळा रचून पकडले. सांडू नारायण शेलार (वय ४६, रा. समतानगर, सिल्लोड) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदाराने घेतलेल्या प्लॉटची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयाकडे करण्यासाठी प्रॉपर्टी एजंट शेलार याने ७० हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केली होती. याची शासकीय पंचासमाेर पडताळणी केली असता आरोपीने ६८ हजार स्वीकारण्याचे कबूल केले. त्यात १० हजार चालान व ५८ हजार लाच घेणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शुक्रवारी सिल्लोड येथील मार्केट यार्ड इमारती येथे एसीबीने सापळला रचला असता एजंट शेलार याला ५८ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. एसीबी पथकाने त्याच्या ताब्यातून लाचेच्या ५८ हजारांसह एक मोबाइल जप्त केला. ही कारवाई एसीबीचे निरीक्षक केशव दिंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिस हवालदार अशोक नागरगोजे, अंमलदार विलास चव्हाण व सी. एन. बागुल यांच्या पथकाने केली. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात आरोपी शेलारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुय्यम निबंधकाची चौकशी होणार का?
प्रॉपर्टी एजंटने शासकीय चालानसह दुय्यम निबंधकाच्या नावे ७० हजारांची लाच मागितल्याचे एसीबीच्या कारवाईत निष्पन्न झाले. याप्रकरणी प्रॉपर्टी एजंट शेलारला अटकही करण्यात आली. परंतु, ज्या अधिकाऱ्यांच्या नावे त्याने लाच मागितली, त्यांची चौकशी केली जाणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.