मान्सून पूर्व तपासणीत धरणांचा आताच धोका, पण 'डॅम सेफ्टी ॲक्ट' नुसार दुरुस्ती पुढील वर्षी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:22 IST2025-06-19T11:19:07+5:302025-06-19T11:22:09+5:30

धोकदायक धरणांचा अहवाल आल्यानंतर नाशिक येथील धरण सुरक्षा संघटनेचे अभियंत्यांचे पथक कॅटेगिरी १ आणि २ मधील प्रकल्पांची तांत्रिक तपासणी करतात.

Pre-monsoon inspection shows dams at risk now, but repairs as per 'Dam Safety Act' to be done next year | मान्सून पूर्व तपासणीत धरणांचा आताच धोका, पण 'डॅम सेफ्टी ॲक्ट' नुसार दुरुस्ती पुढील वर्षी

मान्सून पूर्व तपासणीत धरणांचा आताच धोका, पण 'डॅम सेफ्टी ॲक्ट' नुसार दुरुस्ती पुढील वर्षी

- बापू सोळुंके

छत्रपती संभाजीनगर : लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा)च्या कार्यक्षेत्रांतील आठ धरणे धोकादायक असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या मान्सूनपूर्व धरण तपासणीत आढळून आले आहे. या धरणाची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचा अहवाल नाशिक येथील राज्य धरण सुरक्षा संघटनेला पाठविण्यात आला, पण दुरुस्तीसाठी एक वर्षाहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता ‘कडा’च्या उच्चपदस्थ सूत्रांनी वर्तविली.

नॅशनल डॅम सेफ्टी ॲक्ट आणि स्टेट डॅम सेफ्टी ॲक्ट आल्यापासून राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले. दरवर्षी मान्सूनपूर्व तांत्रिक तपासणी करण्याचे निर्देश आहेत. अतिधोकादायक स्थितीतील धरणांचा समावेश कॅटेगिरी एक मध्ये, तर मध्यम धोकादायक धरणांची कॅटेगिरी दोन आणि किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या धरणांचा समावेश कॅटेगिरी तीनमध्ये करण्यात आला. ‘कडा’च्या वतीने छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यातील १२६ धरणांची तपासणी करण्यात आली. यापैकी ८ धरणे कॅटेगिरी २ मध्ये असल्याचे निदर्शनास आले. या धरणांची पुढील दोन वर्षांत दुरुस्ती न केल्यास हे प्रकल्प कॅटेगिरी एकमध्ये जातील. यानंतर ही धरणे कधीही फुटण्याचा धोका असेल. कॅटेगिरी २ मध्ये समावेश झालेल्या या प्रकल्पांच्या भिंतीला बीळ पडले, तडे गेले, झुडपांनी वेढा दिला आहे. धरणाला ॲप्रोच रस्ता उरला नाही, सांडवा आणि पीच उखडल्याने यातील ७५ टक्के पाणीसाठा वाहून जाण्याची शक्यता आहे. आता पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती शक्य नाही.

प्रक्रियेसाठी एक वर्ष लागते
धोकदायक धरणांचा अहवाल आल्यानंतर नाशिक येथील धरण सुरक्षा संघटनेचे अभियंत्यांचे पथक कॅटेगिरी १ आणि २ मधील प्रकल्पांची तांत्रिक तपासणी करतात. दुरुस्तीसाठी कार्यकारी अभियंत्यांकडून प्रस्ताव तयार करण्यात येतो. हा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळासमोर ठेवून मंजुरी मिळविण्यात येते. नंतर शासनाकडून निधी मिळाल्यावर दुरुस्ती करण्यात येते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक वर्ष लागते.

डॅम सेफ्टी ॲक्टनुसार आता प्रत्येक धरणांचे नियमित मॉनिटरिंग होते. कॅटेगिरी २ मधील धरणांची दुरुस्ती वर्षभरात व्हावी, ही अपेक्षा असते. धरणांची दुरुस्ती न झाल्यास ही धरणे धोकादायक होतात आणि पुढे ते कॅटेगिरी १ मध्ये पोहोचतात. असे होऊ नये, याकरिता कॅटेगिरी २ मधील प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध केला जातो.
- समाधान सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा.

Web Title: Pre-monsoon inspection shows dams at risk now, but repairs as per 'Dam Safety Act' to be done next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.