पोलिस अटकेच्या नोटिसवर स्वाक्षरी विसरले; बनावट नोटा प्रकरणांतील आरोपींना तत्काळ जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:13 IST2025-06-23T14:03:25+5:302025-06-23T14:13:16+5:30

तपास करण्यासाठी पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयास केली होती

Police forgot to sign arrest notice; accused in fake currency cases granted immediate bail | पोलिस अटकेच्या नोटिसवर स्वाक्षरी विसरले; बनावट नोटा प्रकरणांतील आरोपींना तत्काळ जामीन

पोलिस अटकेच्या नोटिसवर स्वाक्षरी विसरले; बनावट नोटा प्रकरणांतील आरोपींना तत्काळ जामीन

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी खून प्रकरणांतील आरोपींना त्यांच्या अटकेची लेखी प्रत न दिल्याने न्यायालयाने त्यांना जामीन दिल्याचा अनुभव पाठीशी असताना शहर पाेलिसांनी सलग दुसऱ्यांदा आरोपींच्या अटकेसाठी कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्याने रविवारी बनावट नोटाप्रकरणी अटकेतील चौथ्या आरोपीला न्यायालयाने रविवारी जामीन मंजूर केला.

राजन अशोक ब्राह्मणे (रा.सोनगाव, ता. राहुरी, अहिल्यानगर) असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. दि. १९ जून रोजी छावणी बाजारात बनावट नोटा जवळ बाळगताना दोघांना गुन्हेशाखा पोलिसांनी पकडले होते, तर तिसरा आरोपी माणिक तुळशीराम आव्हाड यास वाळूज महानगर १ येथून अटक करण्यात आली होती. या आरोपींकडून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. चौकशीदरम्यान यात चौथा आरोपी राजन ब्राह्मणे यास दि. २१ जून रोजी लोणी येथे पकडले. त्याच्या अटकेची माहिती त्याचा भाऊ किरण उर्फ ॲलेक्स अशोक ब्राह्मणे यांना कळविली. आज २२ जून रोजी छावणी पोलिसांनी आरोपी ब्राह्मणे यास १०वे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले.

आरोपींनी बनावट नोटा कोठून आणल्या आणि कोणाकडून घेतल्या? नोटा त्याने कोणास दिल्या? या नोटा पुरवणारा मुख्य सूत्रधार कोण; याबाबत तपास करण्यासाठी पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयास केली. यावेळी आरोपींचे वकील ॲड. संतोष लोखंडे आणि ॲड. सुनीता सोनवणे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, आरोपीच्या अटकेची माहिती त्यास आणि त्याच्या नातेवाईकाला दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. असे असले तरी आरोपीला त्याच्या अटकेच्या कारणांची लेखी नोटीस मिळणे हा त्याचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाचे तसे निर्देश आहेत. यावेळी आरोपीला दिलेल्या नोटीसवर, त्याची स्वाक्षरी घेतल्याचे सादर करण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिस आरोपीच्या स्वाक्षरीचे पत्र न्यायालयात सादर करू शकले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्याने त्यास जामीन देण्याची विनंती ॲड. लोखंडे यांनी केली. आरोपींच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने त्यास तत्काळ जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी याच प्रकरणातील अन्य आरोपींना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन पोलिसांनी न केल्याने जामीन मंजूर केला होता.

बनावट नोटा प्रकरणातील आरोपी राजन ब्राह्मणे यास आज न्यायालयात हजर केले होते. यावेळी त्याच्या अटकेच्या नोटीसवर त्याची स्वाक्षरी घेतली नसल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या बाबींवरच न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला.
- संजय रोकडे, पोलिस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी, छावणी पोलिस ठाणे

Web Title: Police forgot to sign arrest notice; accused in fake currency cases granted immediate bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.