पोलिस बळ तोकडे

By Admin | Updated: May 24, 2014 00:41 IST2014-05-24T00:38:14+5:302014-05-24T00:41:35+5:30

प्रसाद आर्वीकर, परभणी जिल्ह्याची लोकसंख्या कैक पटीने वाढली असून पोलिस बळ मात्र जुन्याच नियमानुसार कार्यरत आहे.

Police force | पोलिस बळ तोकडे

पोलिस बळ तोकडे

प्रसाद आर्वीकर, परभणी जिल्ह्याची लोकसंख्या कैक पटीने वाढली असून पोलिस बळ मात्र जुन्याच नियमानुसार कार्यरत आहे. त्यामुळे अपुर्‍या कर्मचार्‍यांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी येऊन पडली असून, कामाचा ताणही वाढला आहे. परभणी जिल्ह्यात मागील दहा वर्षांच्या लोकसंख्येला अनुसरुनच पोलिस बळ मंजूर आहे. या दहा वर्षांमध्ये जिल्ह्याच्या लोकसंख्येत पटीने वाढ झाली. १८ लाख लोकसंख्येच्या या जिल्ह्यात केवळ १६०० कर्मचार्‍यांवर कायदा व सुव्यवस्थेची भिस्त आहे. वाढलेली लोकसंख्या आणि गतिमान झालेल्या जीवनमानामुळे पोलिस कर्मचार्‍यांवर देखील ताण वाढला आहे. नऊ तालुके असलेल्या या जिल्ह्यात पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नव्याने दोन पोलिस ठाण्याची भर पडली, ही जमेची बाजू असली तरी आहे त्याच कर्मचार्‍यांतून या दोन्ही पोलिस ठाण्यांचा कारभार सांभाळावा लागत आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे, दररोज घडणार्‍या अपघाती घटना, गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांचा तपास लावताना पोलिस कर्मचारी आणि अधिकार्‍यांना कसरत करावी लागते. या दैनंदिन घटना वगळता कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि नागरिकांशी सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी कर्मचार्‍यांना वेळ कमी पडतो, अशी स्थिती आहे. परभणी जिल्ह्याला जुन्याच कोट्यानुसार पोलिस कर्मचार्‍यांची पदे मंजूर आहेत. त्यातही अनेक पोलिस ठाण्यांमध्ये कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात परभणी मुख्यालय, परभणी शहर, परभणी ग्रामीण, पूर्णा, गंगाखेड, सेलू आणि जिंतूर असे सात विभाग असून, उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांचे या विभागावर नियंत्रण आहे. आतापर्यंत १७ पोलिस ठाण्यांमधून कारभार पाहिला जातो. त्यात चारठाणा आणि चुडावा या दोन पोलिस ठाण्यांची भर पडली आहे. पोलिस ठाण्यांची संख्या वाढली तरी पोलिस कर्मचार्‍यांची संख्या जिल्ह्यात वाढण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Police force