आलिशान कार, बॉडीगार्डसह आलेला 'पीएमओ सचिव' निघाला तोतया; शाही विवाहात खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:33 IST2025-11-17T13:33:17+5:302025-11-17T13:33:59+5:30
व्हीआयपी सोहळ्यात 'तोतया' अधिकाऱ्याचा पर्दाफाश! आलिशान कार, अंगरक्षक आणि सरकारी पाट्यांसह ‘पीएमओ सचिव’ बनून आला, थाटमाट पाहून पोलिसही चक्रावले

आलिशान कार, बॉडीगार्डसह आलेला 'पीएमओ सचिव' निघाला तोतया; शाही विवाहात खळबळ!
वाळूज महानगर : धुळे–सोलापूर हायवेवरील तिसगाव येथील हॉटेल ग्रॅण्ड सरोवर येथे रविवारी झालेल्या व्हीआयपी मूव्हमेंट असलेल्या विवाह सोहळ्यात स्वतःला पंतप्रधान कार्यालयातील सचिव आणि नीती आयोगाचा सदस्य असल्याचे भासवून कार्यक्रमात प्रवेश केलेल्या इसमाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. आलिशान इनोव्हा कार, सोबत बॉडीगार्ड, सरकारी पाट्या व तिरंगा ध्वज अशा थाटामाटात फिरणाऱ्या या तोतया अधिकाऱ्याचा भंपकपणा पोलिसांनी उघड केला.
गोपनीय शाखेत कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक सलीम अब्दुल गफूर शेख हे बंदोबस्तावर असताना विवाह सोहळ्यातील सूत्रसंचालकाने “मा. अशोक भारत ठोंबरे – पीएमओ सेक्रेटरी ” असे नाव जाहीर केले. यासंदर्भात पोलिसांकडे कोणतीही अधिकृत माहिती नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्याची पडताळणी करण्यात आली. विचारपूस केली असता त्याने निती आयोगाचा सदस्य असल्याचे सांगितले; मात्र चौकशीत तो गोंधळला व उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याकडे कोणताही शासकीय ओळख पुरावा नव्हता.
लग्न सोहळ्यातून थेट जेलमध्ये
अशोक मोठ्या अधिकाऱ्यांसारख्या आलिशान थाटात राहत होता. कार्यक्रमस्थळी तो इनोव्हा (एम एच १२एस एन ९८९२) कारमधून आला. त्याच्यासोबत विकास प्रकाश खंडागळे नावाचा अंगरक्षकही होता. अधिकारीसदृश वागणे, सूट-बूटातील स्टाईल आणि आत्मविश्वास पाहून बडा अधिकारी असल्याचे अशोक भासवत होता. पोलिसांनी कारची पंचांसमक्ष तपासणी केली असता “भारत सरकार” लिहिलेली पाटी, सरकारी वाहनांवर वापरला जाणारा तिरंगा ध्वज व त्याची धातूची कडी, एक सुटकेस सापडली. ही सामग्री दिल्लीहून मागविल्याचे ठोंबरेने कबूल केले.
यापूर्वीही अनेक कार्यक्रमांना उपस्थिती
हा भामटा पूर्वीही अनेक कार्यक्रमांना गेला असल्याची माहिती असून, त्याने कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास सुरू आहे. कोणाची फसवणूक झालेली असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी केले. अशोक ठोंबरे (वय ४१, धंदा कन्सल्टन्सी, मु. पो. उंदरी, ता. केज जि. बीड) आणि त्याचा साथीदार विकास खंडागळे (वय ३३, धंदा जिम ट्रेनर, रा. मोर्डा ता. तुळजापूर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि नरेश ठाकरे करीत आहेत. सदरील कारवाई पोलिस उपयुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त भागीरथी पवार, पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.