जायकवाडी धरणाजवळील ६० लाखांची पिचिंग वाहून गेली; निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:10 IST2025-09-01T12:09:23+5:302025-09-01T12:10:28+5:30
जायकवाडी विद्युत निर्मिती केंद्राजवळ दीड वर्षांपूर्वीच ६० लाखांतून पिचिंग केली होती

जायकवाडी धरणाजवळील ६० लाखांची पिचिंग वाहून गेली; निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी!
- दादासाहेब गलांडे
पैठण : जायकवाडी धरणाजवळील विद्युत निर्मिती केंद्राच्या (हायड्रो) पाण्यात दगड, माती व इतर घाण जाऊ नये, यासाठी पिचिंगचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून जायकवाडीतून गोदापात्रात सोडलेल्या पाण्यासोबत हे काम वाहून गेलेे. त्यामुळे अवघ्या दीड वर्षांपूर्वी केलेला ६० ते ७० लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हे काम झाले, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
जायकवाडी धरणालगत गोदापात्राला लागून विद्युत निर्मितीचा प्रकल्प आहे. वीज निर्मितीसाठी पंपिंग तसेच विद्युत निर्मिती करताना माती, दगड, टर्बाइनला लागू नये म्हणून येथे पिचिंग व काही काँक्रिटीकरण करण्यात आले होते. दीड वर्षापूर्वी बांधकाम विभागाने कंत्राटदाराच्या माध्यमातून हे काम केले होते. त्यावर सुमारे ६० ते ७० लाखांचा खर्च करण्यात आला होता.
पैसा पाण्यात, चौकशीची मागणी
गोदावरीतून होणाऱ्या संभाव्य विसर्गाच्या अंदाजानुसार हे काम करणे अपेक्षित होते. परंतु, गेल्या दोन आठवड्यांत सोडलेल्या पाण्यात त्याचा निभाव लागू शकला नाही आणि पिचिंग वाहून गेले. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कामाची, ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत बांधकाम विभागाचे घुले यांच्याशी संपर्क केला असता, मी आता हे काम बघत नाही, याबाबत काही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
वरिष्ठांना माहिती देऊ
नुकताच पैठण येथील वीज निर्मिती प्रकल्पाचा पदभार घेतलेला आहे. हे काम अगोदर झालेले आहे. बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम केल्याचे कळते. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली जाईल.
- उमेश देव, उपकार्यकारी अभियंता, हायड्रो