कायमस्वरुपी योजनेचे ‘पाणी’ !

By Admin | Updated: November 4, 2014 01:37 IST2014-11-04T00:47:23+5:302014-11-04T01:37:53+5:30

संदीप अंकलकोटे, चाकूर तालुक्यातील १७ गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणाऱ्या योजना सक्षमपणे चालत नसल्याने दोन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घेतला़

Permanent Plan 'Water'! | कायमस्वरुपी योजनेचे ‘पाणी’ !

कायमस्वरुपी योजनेचे ‘पाणी’ !


संदीप अंकलकोटे, चाकूर
तालुक्यातील १७ गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणाऱ्या योजना सक्षमपणे चालत नसल्याने दोन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घेतला़ त्यामुळे दोन दिवस पाण्याशिवाय कसे काढायचे? असा सवाल होण्याबरोबरच या गावांतील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ओढवली आहे़ परिणामी कायमस्वरूपी पाणी योजनेचा बट्ट्याबोळ झालेला पहावयास मिळत आहे़
चाकूर व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील १७ गावांसाठी घरणी प्रकल्पातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेवर कोटी रूपये खर्च करण्यात येऊन सन २००१ मध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली़ या योजनेत आटोळा, धामणगाव, उजळंब, कुंभेवाडी, आंबेवाडी, कबनसांगवी, अजनसोंडा खु़, तिवघाळ, तिवटघाळ, तळघाळ, बनसावरगाव, नागेशवाडी, लातूररोड, मोहनाळ, कडमुळी, भाटसांगवी, हाळी खु़, वाघोली या गावांचा समावेश होत़
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने या योजनेचे काम केले आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजना अहमदपूरकडेही हस्तांतरीत करण्यात आली़ या योजनेची जलवाहिनी सतत फुटत असल्याने या ग्रामस्थांना ही योजना असून अडचण अन् नसून खोळंबा अशी स्थिती आहे़ या योजनेची मुख्य जलवाहिनी नेहमीच फुटते़ त्यामुळे लाखो लिटर्स पाणी वाहून जाते़ योजना सुरळीत चालत नसल्याने अखेर या योजनेचे पाणी दोन दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़
या योजनेतंर्गत १९ हजार ९४ लोकांना पाणी मिळाले पाहिजे़ त्यासाठी दररोज ७ लाख ६३ हजार लिटर्स पाणी मिळाले पाहिजे़ परंतु, दोन दिवसाला पाणी मिळणार असल्याने आगामी काळात पाण्याचा प्रश्न आणखीन गंभीर होण्याची भिती व्यक्त होत आहे़
तलावात पाणी असताना ग्रामस्थांना वेळेवर आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला अपयश आले़ जेव्हा ही योजना सुरु करण्यात आली़ त्यावेळी जलवाहिनी फुटून ग्रामस्थांना पाणी मिळत नसे़ चाकूर तालुक्याची निर्मिती १५ आॅगस्ट १९९२ ला झाली़ या कार्यालयाची चाकूर येथे स्वतंत्र कार्यालय व्हायला हवे होते़ परंतु, अहमदपूरमधून या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा कारभार हाकला जातो़ या योजनेचे पाणी मिळत नसल्याने, भाटसांगवी, हाळी खु़, वाघोली या तीन ग्रामपंचायतीने या योजनेतून बाहेर पडून आपल्या गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरु केली़ ही योजना चालविण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी मासिक दोन ते अडीच लाख रूपये खर्च होतात़

Web Title: Permanent Plan 'Water'!