लोकसहभागातून पारगावची शाळा ‘हायटेक’ !

By Admin | Updated: February 4, 2016 00:36 IST2016-02-04T00:27:32+5:302016-02-04T00:36:33+5:30

संजय तिपाले , बीड जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की, तुटक्या खिडक्या, गळके छत, तडे गेलेल्या इमारती असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, पारगाव जोगेश्वरी (ता. आष्टी) येथील शाळा त्याला अपवाद ठरली आहे.

People from Pargaon School 'Hi-Tech'! | लोकसहभागातून पारगावची शाळा ‘हायटेक’ !

लोकसहभागातून पारगावची शाळा ‘हायटेक’ !


संजय तिपाले , बीड
जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की, तुटक्या खिडक्या, गळके छत, तडे गेलेल्या इमारती असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, पारगाव जोगेश्वरी (ता. आष्टी) येथील शाळा त्याला अपवाद ठरली आहे. घोकमपट्टी, पाठांतर ही पारंपरिक शिक्षणपद्धती शाळेने कधीच बाजूला सारली आहे. येथे ऊसतोड कामगार व पारधी कुटुंबियांची मुलेही आता ‘प्रोजेक्टर’द्वारे ‘हायटेक’ शिक्षण घेत आहेत. ज्ञानरचनावादी या उपक्रमशील शिक्षणपद्धीला लोकसहभागाची जोड मिळाल्याने ही किमया झाली.
बीड व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील पारगाव जोगेश्वरी हे या ३ हजार लोकसंख्येच्या गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा आहे. जोगेश्वरी देवीच्या पुरातन मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले हे गाव आता ज्ञानरचनावादी शिक्षणाचे ‘रोल मॉडेल’ म्हणून पुढे येत आहे. परिसरात ऊसतोड कामगार व पारधी पेढ्या असल्याने शाळेतील सव्वादोनशेपैकी निम्मे विद्यार्थी याच उपेक्षित घटकातील! विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागावा यासाठी शिक्षकांनी गेल्या दीड वर्षांपासून विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेतले.
विद्यार्थ्यांच्याच मदतीने प्रत्येक वर्गासाठी शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण केले. विद्यार्थ्याची आवड, क्षमता तपासून त्यानुसार त्याला घडविण्याचा उपक्रम सुरु झाला. त्यामुळे पारधी व ऊसतोड कामगार कुटुंबांतील मुले आता फाडफाड इंग्रजी वाचत- बोलत आहेत. शिष्यवृत्ती, विज्ञान प्रदर्शन, नवोदय परीक्षा यामध्येही विद्यार्थ्यांनी ठसा उमटविला आहे.
संजय व भीमराव गुरव यांनी २००४ मध्ये शाळेसाठी स्वत:ची अडीच एकर जमीन दान दिली होती. त्याच जागेच सात वर्गांसाठी हक्काचे छत असून एकूण दहा खोल्यांचे बांधकाम आहे. शाळेत खेळाच्या साहित्यापासून ते वाद्यवृंदापर्यंत सारे काही उपलब्ध केले आहे. शाळेतील फरशांवर अंकगणित, भूमिती, मराठी, इंग्रजी शब्दकोडे, घड्याळ रंगरंगोटीतून साकरले आहे. त्यामुळे विद्यार्थी मधल्या सुटीत त्यावर रमताना दिसतात. शाळेच्या परिसरात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब साचविला जातो. या पाण्यावरच फुलझाडे बहरली आहेत. परसबागेतच पोषण आहारासाठी लागणारी भाजीपाला पिके घेतली जातात.
मुख्याध्यापक मधुकर मोरे, शिक्षक विष्णू नेहरकर, सोमनाथ वाळके, सलाउद्दीन सय्यद, परमेश्वर धस, राजेंद्र पवार, प्रदीप कोकाटे, सोनाली राऊत, केशर भोसले हे सर्व जण उपक्रमशील शिक्षणासाठी प्रयत्नशील असतात.

Web Title: People from Pargaon School 'Hi-Tech'!