आजोबांच्या गावच्याच लोकांनी दीड कोटींच्या खंडणीसाठी रचला नातीच्या अपहरणाचा डाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:51 IST2025-07-18T11:50:23+5:302025-07-18T11:51:38+5:30
आजोबांच्या आलिशान गाड्या, प्रॉपर्टी पाहून गावच्या लोकांनी रचला डाव,

आजोबांच्या गावच्याच लोकांनी दीड कोटींच्या खंडणीसाठी रचला नातीच्या अपहरणाचा डाव
छत्रपती संभाजीनगर : खासगी शिकवणी संपवून निघालेल्या ११ वर्षीय मुलीचा चार आरोपींनी कारमधून अपहरणाचा प्रयत्न बुधवारी (दि. १५) केला हाेता. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही मोठी दुर्घटना टळली. शहर पोलिसांच्या दहापेक्षा अधिक पथकांनी राताेरात आरोपींची ओळख पटवत दोघांना बेड्या ठाेकल्या. अपहरणकर्ते व मुलीचे आजोबा एकाच गावचे असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्या मुलीच्या आजोबाकडून दीड कोटी रुपये खंडणी उकळण्यासाठी हा प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समाेर आली.
अटक केलेल्या आरोपींमध्ये संदीप उर्फ पप्पू साहेबराव पवार (३२, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना) आणि बाबासाहेब अशोक मोरे (४२, रा. विठ्ठलवाडी, ता. अंबड, जि. जालना) यांचा समावेश आहे. या घटनेचा मास्टरमाइंड गणेश ज्ञानेश्वर मोरे आणि बळीराम उर्फ भय्या मोहन महाजन (दोघेही रा. विठ्ठलवाडी, ता. अंबड, जि. जालना) हे फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार घटना घडल्यानंतर आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखा, सायबर, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यासह झोन-२मधील डीबी पथकांना कामाला लावले होते.
घटनास्थळी सोडलेली गाडी, गाडीतील नंबर प्लेट, सीसीटीव्ही फुटेजसह मुलगी, चालकाच्या वर्णनावरून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्यानुसार आरोपीच्या गावी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांचे पथक पाठविले. पथक गावात पोहचल्यानंतर गुन्ह्यातील दोन आरोपी अंबड - पाचोड रस्त्यावरील पिंपरखेड येथील हॉटेल लोकसेवा येथे जेवण करीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने हॉटेलमधून दोन आरोपींना ताब्यात घेतले. शहरात आणल्यानंतर चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त प्रशांत स्वामी, रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, कृष्णा शिंदे, शिवचरण पांढरे, सहायक निरीक्षक विनायक शेळके, रविकांत गच्चे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, नवनाथ पाटवदकर, विशाल बोडके, प्रवीण वाघ यांच्या पथकांनी केली.
कुटुंबाला दिले संरक्षण
अपहरणाचा प्रयत्न झालेल्या मुलीच्या कुटुंबाला शहर पोलिसांनी संरक्षण दिले आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या प्रकरणाशी साधर्म्य
बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चैतन्य तुपे याच्या अपहरणानंतर आरोपींनी फोन करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या घटनेतील आरोपी आलना जिल्ह्यातीलच होते. त्यांनी बाहेरून येऊन अपहरण केले होते. बुधवारी घडलेल्या घटनेतही आरोपी जालना जिल्ह्यातीलच असून, त्यांनीही दीड कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा कट होता. तसेच यात मुलीचे आजोबा हे जमीन व्यावसायिक आहेत.