इकडे लक्ष द्या! बीबी का मकबऱ्यात विद्यार्थ्यांना पाच दिवस मोफत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 20:12 IST2025-11-21T20:12:15+5:302025-11-21T20:12:35+5:30
प्रदर्शनाला भेट देण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन

इकडे लक्ष द्या! बीबी का मकबऱ्यात विद्यार्थ्यांना पाच दिवस मोफत प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : जागतिक वारसा दिन सप्ताहानिमित्त ‘बीबी का मकबरा’मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनासह मकबरा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय केंद्रीय पुरातत्व विभागाने घेतला आहे. त्यासाठी माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यास पुरातत्व विभाग सकारात्मक प्रतिसाद देत २५ नोव्हेंबरपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देत आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी लाठकर यांनी शाळांना केले आहे.
केंद्रीय पुरातत्व विभागाने मकबरामध्ये जागतिक वारसा दिन सप्ताहाचे १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान आयोजन केले आहे. यानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचवेळी शहरासह जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना या प्रदर्शनासह बीबी का मकबरा पाहण्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षणाधिकाऱ्यांनी पुरातत्वच्या अधिकाऱ्यांकडे केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी १५ वर्षांच्या आतील शालेय विद्यार्थ्यांना प्रदर्शनासह मकबरा पाहण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मोफत उपलब्ध करून देण्यात आला. तसेच यानिमित्त २० नाेव्हेंबर राेजी सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, २१ ला निबंध आणि २५ नोव्हेंबर रोजी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा ठेवली असल्याचे ही शिक्षणाधिकारी लाठकर यांनी स्पष्ट केले. या उपक्रमासाठी शाळांनी विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करावे, असे आवाहन लाठकर यांनी केले.