पालकांनो, शाळा निवडा, 'ही' कागदपत्रे तयार ठेवा; ‘आरटीई’ची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 19:40 IST2026-01-10T19:40:28+5:302026-01-10T19:40:53+5:30
आरटीई ॲक्टनुसार खासगी आस्थापनांचा अल्पसंख्याक दर्जा वगळता इतर सर्व प्रकारच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या आहेत.

पालकांनो, शाळा निवडा, 'ही' कागदपत्रे तयार ठेवा; ‘आरटीई’ची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार
- राम शिनगारे
छत्रपती संभाजीनगर : आरटीई ॲक्टनुसार आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारपासून विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा नोंदणी आणि शाळा व्हेरिफिकेशनची लिंक सुरू झाली. शाळा नोंदणीनंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच उपलब्ध जागांसह इतर सर्व बाबींची स्पष्टता येत. त्याविषयीचे वेळापत्रकच शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले.
खासगी शाळांत २५ टक्के जागा राखीव
आरटीई ॲक्टनुसार खासगी आस्थापनांचा अल्पसंख्याक दर्जा वगळता इतर सर्व प्रकारच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या आहेत.
शाळांच्या नोंदणीला सुरुवात
शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ९ जानेवारीपासून शाळांच्या नोंदणी आणि व्हेरिफिकेशनला सुरुवात झाली. त्यानुसार १९ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
जानेवारी-फेब्रुवारीत प्रवेशप्रक्रिया सुरू होणार
शाळांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार पडताळणीही नोंदणीच्या कालावधीतच होईल. त्यामुळे प्रवेशप्रक्रियाही जानेवारी-फेब्रुवारीत सुरू होणार असल्याचा अंदाज शालेय शिक्षण विभागाने वर्तविला.
जिल्ह्यात ४ हजार जागा, गतवर्षी साडेतीन हजार प्रवेश
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५६५ शाळांमध्ये आरटीईनुसार प्रवेश होतात. त्यात ४ हजार ३४९ जागा राखीव आहेत. मागील वर्षी या जागांपैकी ३ हजार ७२६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. उर्वरित जागा रिक्त होत्या.
शिक्षण विभागाची तयारी काय?
आरटीईनुसार प्रवेशाची तयारी प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे. पात्रताधारक शाळांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. नोंदणी केलेल्या शाळांची पडताळणी होत आहे.
पालकांनो, शाळा निवडा, ही कागदपत्रे तयार ठेवा
आरटीईनुसार ऑनलाइन नोंदणी करताना अनेक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. त्यासाठी ऐनवेळी धावपळ होऊ नये, यासाठी पालकांनी आतापासूनच तयारी करावी. आपल्या परिसरातील शाळांचीही निवड करण्याची गरज आहे.
शाळांचे प्रतिपूर्ती शुल्क रखडलेलेच
शालेय शिक्षण विभागाने आगामी वर्षातील आरटीई प्रवेशाची तयारी सुरू केलेली असतानाच शाळांचे चालू वर्षासह काही वर्षांपूर्वीपासूनचे प्रतिपूर्ती शुल्क रखडलेलेच आहे. ते मिळविण्यासाठी शाळाचालकांना उच्च न्यायलयातही धाव घ्यावी लागलेली आहे.
शाळांची नाेंदणी सुरू
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी शाळांच्या नोंदणीला सुरुवात झाली. त्यामुळे पात्रताधारक शाळांनी तत्काळ नोंदणी करून, व्हेरिफिकेशनही करून घ्यावे. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा लवकरच पूर्ण होईल.
- जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग