Parabhani: सेलूजवळ पुसदचे युवक-युवती रेल्वेतून कोसळले; युवतीचा मृत्यू, युवक व्हेंटिलेटरवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 18:35 IST2025-12-15T18:33:57+5:302025-12-15T18:35:44+5:30
अपघातामागील गूढ कायम; मृत्यूच्या धक्क्याने मृत युवतीची बहीण बेशुद्ध

Parabhani: सेलूजवळ पुसदचे युवक-युवती रेल्वेतून कोसळले; युवतीचा मृत्यू, युवक व्हेंटिलेटरवर
- रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (परभणी): सेलू रेल्वेस्थानकावरून सोमवारी सकाळी प्रवास सुरू झालेल्या एका पुणे-नांदेड एक्स्प्रेसने यवतमाळ जिल्ह्यातील दोन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सेलूजवळ ढेंगळी पिंपळगावनजीक रेल्वेतून खाली पडून १६ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेला युवक गंभीर जखमी असून तो व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान नेमके काय घडले?
सोमवारी सकाळी ७:३० वाजता सेलू रेल्वेस्थानकावरून पुणे-नांदेड एक्स्प्रेस सुटली. मिळालेल्या माहितीनुसार, या गाडीतून एक युवक आणि दोन युवती प्रवास करत होत्या. ढेंगळी पिंपळगावनजीकच्या परिसरात हे युवक-युवती अचानक रेल्वेतून खाली पडले. खाली पडलेली अक्षरा गजानन नेमाडे (वय १६) (रा. पुसद, जि. यवतमाळ) ही युवती बेशुद्ध अवस्थेत होती, तर राजेंद्र दिपक उमाप (रा. पुसद) हा युवक गंभीर जखमी झाला होता.
युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू
रेल्वे पोलीस हवालदार कैलास वाघ आणि संदीप जोशी यांनी तातडीने दोघांना सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. बेबी गिरी यांनी अक्षराला मृत घोषित केले. गंभीर जखमी राजेंद्र उमाप याला प्रथमोपचारानंतर परभणी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याने तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे.
मृत्यूच्या धक्क्याने बहीण बेशुद्ध
या अपघातामुळे नेमाडे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. अक्षरा आणि तिची बहीण अनुष्का गजानन नेमाडे या दोघीही मागील आठ दिवसांपासून सेलू येथील नातेवाईकांकडे राहत होत्या आणि घटनेच्या दिवशी त्या पुसदला (घरी) जात होत्या. अनुष्का ही अक्षरासोबतच त्याच एक्सप्रेसमध्ये होती, मात्र ती घटनास्थळी खाली पडली नव्हती. रेल्वे परभणीत थांबल्यानंतर ती वाहनाने सेलूला आली, तेव्हा तिला अपघाताची आणि अक्षराच्या मृत्यूची माहिती मिळाली. बहिणीच्या मृत्यूचा जबरदस्त धक्का बसल्याने अनुष्का बेशुद्ध पडली आणि तिला तातडीने सेलू येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातामागील गूढ कायम
अक्षरा आणि अनुष्का या दोन बहिणींसोबत पुसदचा राजेंद्र उमाप हा युवक कसा व कोठे सोबत आला? आणि रेल्वेतून खाली पडण्याचा नेमका प्रकार काय होता? उपचार घेत असलेल्या राजेंद्र उमापचा जबाब आणि अनुष्काच्या माहितीनंतरच या गूढ अपघाताचा नेमका उलगडा होऊ शकेल, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे. पुसदहून नातेवाईक सेलूकडे रवाना झाले आहेत.