औट्रम आधीच बंद आता कन्नड, तलवाडा घाटातूनही वाहतूकीस ६ महिन्यांसाठी बंदी, पर्याय कोणते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 19:08 IST2025-11-26T19:05:39+5:302025-11-26T19:08:15+5:30
६० ते ७० कि.मी.चा फेरा पडणार; चाळीसगाव, धुळ्याकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गे

औट्रम आधीच बंद आता कन्नड, तलवाडा घाटातूनही वाहतूकीस ६ महिन्यांसाठी बंदी, पर्याय कोणते?
छत्रपती संभाजीनगर : कन्नड, तलवाडा घाटादरम्यानच्या मार्गाची दुरुस्ती व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होणार असून २५ नोव्हेंबर ते २५ एप्रिल, २०२६ पर्यंत हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक अन्य मार्गेे वळवण्यात आल्याचे जिल्हा पोलिसांनी सांगितले. यामुळे सुमारे १३ हजार जड वाहनांना वैजापूर ते नांदगाव मार्गे सुमारे ६० ते ७० कि.मी.चा वळसा घालून जिल्ह्यातील इतर भागांच्या मुख्य रस्त्याला यावे लागणार आहे. कारण उत्तर भारत, मध्य प्रदेश, गुजरातला जोडणारा औट्रम घाट २०२३ पासूनच जड वाहतुकीसाठी बंद आहे.
एमएसआयडीसीकडे तलवाडा घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. औट्रम घाटाचा पर्यायी रस्ताही खराब झाल्याने तो तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश न्यायालयाने मध्यंतरी दिले होते. त्यामुळे नांदगाव-मालेगाव-येवला-वैजापूर या मार्गावरून जड वाहतूक वळविण्याचा निर्णय झाला होता. नांदगाव- शिऊर बंगला ते तलवाडा रस्ता दुरुस्तीसाठी सहा महिने लागणार आहेत. बांधकाम विभागाचे अंतर्गत जिल्हा रस्ते जड वाहतुकीमुळे उखडून गेले आहेत.
पूर्वीचा मार्ग - वळवण्यात आलेल्या वाहतुकीचा मार्ग
१. छत्रपती संभाजीनगरकडून कन्नड, तलवाडा घाटातून चाळीसगावकडे जाणारी वाहने साजापूर, लासूर, गंगापूर चौफुली, वैजापूर, येवला, मनमाड, चाळीसगाव, धुळ्याकडे जातील.
२. छत्रपती संभाजीनगरकडून कन्नड, तलवाडा घाटातून धुळ्याकडे जाणारी वाहने - साजापूर (सोलापूर-धुळे मार्ग) माळीवाडा, समृद्धी महामार्गाने झांबरगावपर्यंत जाऊन खाली उतरून गंगापूर चौफुली, वैजापूर, येवला, मनमाड मार्गे धुळ्याकडे जातील.
३ छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव, धुळेकडे जाणारी जड वाहतूक - साजापूर, कसाबखेडा फाटा, देवगाव रंगारी, शिऊर, वैजापूर मार्गे येवला, मनमाड, चाळीसगाव मार्गे धुळ्याकडे जाईल.