विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य; ‘त्या’ व्हॅनचालक, रिक्षाचालकाचे लायसन्स, परमिट होणार रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:39 IST2025-08-08T17:39:53+5:302025-08-08T17:39:53+5:30
शहरात गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या घटनेत दोन विद्यार्थिनींसोबत व्हॅनचालक आणि रिक्षाचालकाने अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.

विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य; ‘त्या’ व्हॅनचालक, रिक्षाचालकाचे लायसन्स, परमिट होणार रद्द
छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य करणारे व्हॅनचालक आणि रिक्षाचालकाचे लायसन्स आणि परमिट रद्द करण्यात येणार आहे. दोघांना नोटीस देऊन ही प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.
शहरात गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या घटनेत दोन विद्यार्थिनींसोबत व्हॅनचालक आणि रिक्षाचालकाने अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत दोन्ही चालकांचे लायसन्स आणि परमिट रद्द करण्याची कारवाई करण्याचा निर्णय आरटीओ कार्यालयाने घेतला आहे.
पालकांनो, ही घ्या काळजी
- वाहन आणि चालकाची पार्श्वभूमी तपासा.
- वाहनाचा परवाना आणि ड्रायव्हिंग लायसन्स वैध आहे का, याची खात्री करा.
- चालकाने पोलिस व्हेरिफिकेशन केलेले आहे का ते तपासा.
- वाहन शाळेने अधिकृतरित्या नियुक्त केले आहे का, याची माहिती घ्यावी.
- वाहनाची माहिती जवळ ठेवा.
- वाहनाचा नंबर, ड्रायव्हरचा मोबाइल नंबर आणि मार्गाची माहिती ठेवावी.
- मुलांना दररोज वाहनातील परिस्थितीबद्दल विचारपूस करावी.
- काही अडचण, अस्वस्थता, गैरवर्तन झाले असेल, तर मुलांनी ते खुलेपणाने सांगावे, यासाठी विश्वासाचे वातावरण तयार करावे.
- मुलींना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्व-संरक्षण प्रशिक्षण दिले जावे.
- मुलांना शक्यतो गटाने किंवा परिचित विद्यार्थ्यांसोबत प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करावे.
- एकटी विद्यार्थिनी पाठवण्याऐवजी इतरांसोबत बसवण्याची व्यवस्था करावी.
- जीपीएस ट्रॅकिंग असलेले वाहन निवडा.
- मुलगी अचानक गप्प गप्प होणे, घाबरणे, रडणे किंवा शाळेला जाण्यास टाळाटाळ करणे, याकडे वेळीच लक्ष द्यावे.