आता हद्दच ! अंत्यसंस्काराच्या पावतीसाठी मनपा कर्मचाऱ्याने घेतली ५०० रुपयांची लाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:57 IST2025-11-15T14:42:26+5:302025-11-15T14:57:06+5:30
झोन ६ च्या कंत्राटी कर्मचाऱ्यासह झेरॉक्स सेंटर चालकाला ५०० ची लाच स्वीकारताना अटक

आता हद्दच ! अंत्यसंस्काराच्या पावतीसाठी मनपा कर्मचाऱ्याने घेतली ५०० रुपयांची लाच
छत्रपती संभाजीनगर : वर्षभरापूर्वी अपघाती निधन झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या पावतीची प्रत व अन्य कागदपत्र देण्यासाठी १ हजार रुपये मागून ५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मनपाचा कंत्राटी कर्मचारी फिरोज जाफर खान (वय ४५, रा. रोजाबाग) व झेरॉक्स सेंटर चालक शेख कडू इब्राहिम (५३, रा. चिकलठाणा) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. शुक्रवारी सायंकाळी ६:०० वाजता मनपाच्या झोन सहामध्ये ही कारवाई करण्यात आली.
लाचेची तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या चुलत भावाचे जून, २०२४ मध्ये अपघाती निधन झाले होते. त्यांनी अंत्यविधीची पावती घेतली होती. मात्र, ती गहाळ झाल्याने मृताच्या पत्नीने पुन्हा झोन क्रमांक सहाच्या कार्यालयात अंत्यविधी केल्याची पावतीची प्रत आणि त्या सोबतची कागदपत्रे मिळविण्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी अर्ज केला होता. मात्र, आरोपी संगणक ऑपरेटर फिरोज खानने अंत्यविधी पावती आणि त्या सोबतचे कागदपत्रे देण्यासाठी १ हजार रुपयांची मागणी केली. शिवाय, तक्रारदाराला तीन दिवस वाट पाहायला लावून ताटकळत ठेवले. यामुळे संतप्त मृताच्या भावाने १४ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे त्याची तक्रार केली. कांगणे यांनी पोलिस निरीक्षक योगेश शिंदे, वाल्मीक कोरे यांना तक्रारीची खातरजमा करण्याचे आदेश दिले.
किमान ५०० रुपये तरी द्यावेच लागतात
अधिकाऱ्यांनी तक्रारीची खातरजमा केली असता आरोपी फिरोजने पंचासमक्ष तक्रारदाराला १ हजारांची लाच मागताना निष्पन्न झाले. तडजोडीअंती ५०० रुपये तरी द्यावेच लागतील, अशी अट घातली. खात्री होताच निरीक्षक शिंदे, कोरे यांनी झोन कार्यालयाबाहेर सापळा रचला.
झेरॉक्स सेंटर चालक स्वीकारत होता पैसे
आरोपी फिरोजने तक्रारदाराला ठरल्याप्रमाणे पाचशे रुपये कार्यालयाबाहेरील झेरॉक्स सेंटर चालक शेख कडू इब्राहिम याच्याकडे देण्यास सांगितले. सायंकाळी त्याने पैसे स्वीकारताच पथकाने धाव घेत शेख कडूला ताब्यात घेतले. त्यानंतर आत बसलेल्या फिरोजलाही अटक करण्यात आली.