अपहरण नव्हे वडिलांच्या धाकाने सोडले घर; ७० किमी चालत दोघे पोहचले रेल्वेस्टेशनवर, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 18:34 IST2025-08-08T18:30:58+5:302025-08-08T18:34:40+5:30
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर दोन्ही अल्पवयीन मुले सापडले

अपहरण नव्हे वडिलांच्या धाकाने सोडले घर; ७० किमी चालत दोघे पोहचले रेल्वेस्टेशनवर, पण...
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथील दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याचा गुन्हा ७ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. मात्र, त्यांचे अपहरण झाले नव्हते तर वडिलांच्या धाकाने त्यांनी घर सोडल्याचे स्पष्ट झाले असून दोघेही सुखरूप आहेत. मुलांच्या एका नातेवाईकाने छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वेस्टेशनवर दिसताच वेळीच थांबवून ठेवल्याने दोघेही आणखी दूर जाण्यापासून वाचले.
शेख अरबाज शेख अय्युब ( १६), शेख अमान शेख गुलाब (१५, रा.दोन्ही बोरगाव बाजार) असे अल्पवयीन मुलांची नावे आहेत. बुधवारी सकाळी हे दोघे स्वतःच्या घरच्या बकऱ्या व काही जनावरे घेऊन गावातील तलावाजवळ असलेल्या खंडोबा महाराज मंदिराजवळ बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारी जवळच असलेल्या तलावात दोघेही अंघोळ करण्यासाठी उतरले. दरम्यान, तेथे आलेल्या अरबाजचे वडील शेख आयुब यांनी, 'तुम्हाला पाण्याचा अंदाज नाही, लवकर बाहेर निघा' असे म्हणत रागावले. यामुळे दोघेही बाहेर आले. मात्र, घरी गेल्यानंतर वडील पुन्हा रागावतील अशी भीती वाटल्याने दोघांनी तेथून निघण्याचा निर्णय घेतले. बकऱ्या तिथेच सोडून दोघेही दुपारी २ वाजेच्या दरम्यान तेथून सिल्लोडकडे पायी निघाले. सायंकाळी ७ वाजता सिल्लोडला आले तर तेथून पुन्हा छत्रपती संभाजीनगरकडे ते चालत निघाले. फुलंब्री येथे आल्यानंतर त्यांनी एकास लिफ्ट मागितली. त्यानंतर रात्री छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वेस्टेशनजवळ ते पोहचले.
दरम्यान, कोणत्याही ट्रेनमध्ये बसून दूर जाण्याच्या इच्छेने दोघेही आज, सकाळी १० वाजता स्टेशनवर आले. ट्रेनमध्ये बसण्याच्या बेतात असतानाच बोरगाव बाजार येथील एका नातेवाईकांने त्यांना पाहिले. त्याने मुलांना थांबवून ठेवत तत्काळ मुलांच्या वडिलांना माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी रेल्वे स्टेशनवर येत मुलांना ताब्यात घेत सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर केले. पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक मनीष जाधव, पोहेका विष्णू कोल्हे यांनी जाब जवाब घेऊन दोन्ही मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले.
मुलांचे अपहरण झाले नव्हते, त्यांनी स्वतःहून पलायन केले होते. छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वेस्टेशन येथे सापडल्यानंतर त्यांना आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
- रवींद्र ठाकरे, पोलीस निरीक्षक, सिल्लोड ग्रामीण.