लग्नात नो बँड-बाजा, नो वरात; नवरी साधेपणाने घरात; ‘कोर्ट मॅरेज’कडे तरुणाईचा कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:26 IST2025-12-03T12:25:34+5:302025-12-03T12:26:28+5:30
छत्रपती संभाजीनगरात दोन महिन्यांत १४९ विवाह साधेपणाने

लग्नात नो बँड-बाजा, नो वरात; नवरी साधेपणाने घरात; ‘कोर्ट मॅरेज’कडे तरुणाईचा कल
छत्रपती संभाजीनगर : लग्न हा आयुष्यातील सुंदर सोहळा. काही जण हा सोहळा हजारो पाहुण्यांसोबत साजरा करतात, तर काही दोन साक्षीदारांसह साधेपणाने रजिस्ट्रार ऑफिसमध्ये. दोन्हींच्या मागे भावना एकच आहे, ‘आम्हाला आयुष्यभर सोबत राहायचेय’.
दिवाळीनंतर तुळसी विवाहाच्या मुहूर्तावर शहरात लग्नांच्या लगबगीला सुरुवात झाली आहे. बँड-बाजा, शहनाई, डेस्टिनेशन वेडिंग आणि भव्य रिसेप्शन होत असतानाच दुसऱ्या बाजूला साधेपणाने, कमी खर्चात आणि वेळ वाचवत ‘कोर्ट मॅरेज’ची निवड करणाऱ्या तरुणाईची संख्याही झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत १४९ ‘कोर्ट’ विवाह झाले आहेत.
२०२४ मध्ये पारंपरिक लग्नांना मोठा कल दिसला. अनेकांनी लाखोंचा खर्च करत पारंपरिक रीतीने विवाह केले तर ६८४ जणांनी ‘कोर्ट मॅरेज’ला प्राधान्य दिले. २०२५मध्ये पारंपरिक लग्नांची संख्या कायम असली, तरी कोर्ट विवाहाचा टक्काही दरवर्षी वाढताना दिसत आहे. शहरात दोन प्रवाह एकाच वेळी वेगाने पुढे जात आहेत. एकीकडे धुमधडाक्यातील मोठे लग्न आणि दुसरीकडे कमी खर्चात साध्या पद्धतीने विवाह करणारी तरुणाई.
भव्य लग्नांची धूम
हॉटेल बुकिंग्स, फार्म हाऊस, डेस्टिनेशन लग्न, आकर्षक सजावट, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, मेकअप, प्री-वेडिंग, फोटोशूट यामुळे लग्नसमारंभांचे बजेट कोट्यवधींपर्यंत जात आहे. काही कुटुंबे प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून खर्च करतात. मेकअप आर्टिस्ट, फोटोग्राफर्स, वेडिंग प्लॅनर्स सगळ्यांच्या तारखा या सीझनमध्ये आधीच गेल्या आहेत.
कोर्ट मॅरेजकडे कल
अनेक जोडपी आता प्रश्न उपस्थित करत आहेत की, ‘लग्न म्हणजे सोहळा की आयुष्याची सुरुवात?’ यासाठीच त्यांनी ‘तामझाम’ न करता कोर्ट मॅरेजची निवड केली आहे. १४९ जोडप्यांनी याच कारणांमुळे मागील दोन महिन्यांत कोर्ट विवाहाला प्राधान्य दिले. लग्न म्हणजे कर्ज घेऊन केलेला सोहळा नाही, तर एका सुंदर नात्याची जबाबदारी असा हा विचार रुजतोय.
गेल्या ४ वर्षांत झालेले ‘कोर्ट मॅरेज’
२०२१- ४४२
२०२२- ५३७
२०२३- ७४६
२०२४- ६८४