असे बँक अधिकारी हवेत! मजुराच्या मृत्यूनंतर खात्यात अल्प रक्कम,तरीही पत्नीस मिळवून दिले ४ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 17:39 IST2022-04-11T17:35:42+5:302022-04-11T17:39:01+5:30
मजुराचे अपघाती निधन झाले, हतबल पत्नी बँक खात्यातील रक्कम काढण्यास गेली

असे बँक अधिकारी हवेत! मजुराच्या मृत्यूनंतर खात्यात अल्प रक्कम,तरीही पत्नीस मिळवून दिले ४ लाख
- दत्ताञय पवार
करंजखेड (औरंगाबाद ): बँकेत कृषीविमा, दैनदिन व्यवहार पूर्तता करताना अनेकांना बकेतील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कटू अनुभव आले असतील. मात्र, एका मजुराच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीस खात्यात अल्प रक्कम असतानाही ४ लाख रुपयांचे अर्थसहाय्य जागरूक बँक व्यवस्थापकामुळे मिळाले आहे. या सुखद घटनेसोबतच या बँक शाखेने विक्रमी ७ कोटी रुपयांचा पिक विमा वाटप केल्याने शेतकऱ्यातून आनंद व्यक्त होत आहे.
कन्नड तालुक्यात करंजखेड येथे इंडियन बँकेची शाखा आहे. नागापुर ( ता.कन्नड ) येथील मजूर विष्णू लालचंद जाधव यांचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. विष्णू जाधव यांचे येथील इंडियन बँकेच्या शाखेत खाते होते. विष्णू जाधव यांच्या पत्नी संगीताबाई पतीचे पासबुक घेऊन खात्यात काही रक्कम असेल तर काढण्यासाठी शाखेत आल्या. येथे शाखा व्यवस्थापक सौरभ येगावकर यांची भेट घेऊन पतीच्या खात्यावर काही रक्कम असेल तर सर्व बाबींची पूर्तता करून देण्याची विंनती केली.
दरम्यान, व्यवस्थापक सौरभ यांनी विष्णू जाधव यांच्या खात्याची तपासणी केली. यावेळी खात्यात अल्प रक्कम होती. मात्र, विष्णू जाधव यांनी पंतप्रधान सुरक्षा विमा व जिवन ज्योती विमा घेतलेला होता. त्यानंतर अधिकारी नागनाथ साखरे यांनी संगीता जाधव यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे जमा केली. पाठपुरावा करत दोन्ही विम्यातून त्यांना प्रत्येकी दोन असे चार लाख रुपये मिळवून दिले. घरातील एकमेव कमावता पुरुष पतीच्या मृत्यूनंतर समोर अंधकार असताना संगीता जाधव यांना मोठे आर्थिक पाठबळ मिळवून देण्याऱ्या जागरूक बँक अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पिकविम्याचे उद्दिष्ट ३ कोटींचे वाटप सात कोटी..
किसान विकास योजना अंतर्गत येथील शाखेस ३ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु, शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पिक कर्जाची मागणी होत होती. यामुळे यावर्षी शाखेने ५०० शेतकऱ्यांना तब्बल सात कोटी रुपयांच्या पिक कर्जाचे वाटप केले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येथील शेतकरी दरवर्षी पिककर्ज वेळेवर भरतात, थकबाकी ठेवत नाहीत, अशी माहिती शाखा व्यवस्थापक सौरभ गोविंदराव येगावकर यांनी दिली. बँकेच्या शेतकरी हिताच्या कामांमुळे गावातील कौतिकराव जाधव, बाळासाहेब पवार, विनायकराव काळे, राजेंद्र बोरसे आदी शेतकऱ्यांनी व्यवस्थापक सौरभ येंगावकर, अधिकारी नागनाथ साखरे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे स्वागत केले आहे.